आता कोल्हापूरच्या विजयानंतर तरी सतेज पाटील यांना काँग्रेस प्रमोशन देतं का हे पाहावं लागेल.
प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून मैदानात उतरलेल्या काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी मोठा विजय मिळवला.जयश्री जाधव यांनी भाजप उमेदवार सत्यजीत कदम यांचा जवळपास 18 हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. या निवडणुकीत दोन्ही बाजूंकडून दोन पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि काँग्रेसकडून पालकमंत्री सतेज पाटील हे आमने-सामने होते. 2019 प्रमाणे या निवडणुकीतही सतेज पाटील यांचं वर्चस्व दिसून आलं. सतेज पाटील यांनी 2019 मध्ये आधी भाजपमुक्त कोल्हापूर केलं. त्यानंतर आता पोटनिवडणुकीतही सतेज पाटलांनी भाजपला कोल्हापुरात घुसू दिलं नाही. 2014 पासून काँग्रेसचा कठीण काळ सुरु झाला, मात्र सतेज पाटील यांनी त्यांच्या जिल्ह्यात काँग्रेसचा गुलाल कायमच उधळला.
2014 पासून काँग्रेसचा कठीण काळ सुरू झाला तेव्हापासून कोल्हापुरात मात्र प्रत्येक निवडणूक सतेज पाटील निग्रहाने जिंकत आलेत. त्यांच्या विजयात सातत्य दिसतंय. अन्य महापालिका काँग्रेसने गमावल्या असताना, सतेज पाटलांच्या नेतृत्त्वात काँग्रेस-राष्ट्रवादीने महापालिकेवर झेंडा फडकवला.याशिवाय 2019 च्या निवडणुकीत जिल्ह्यातील 10 पैकी 4 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला, तर राष्ट्रवादीने 2 जागा जिंकल्या. ज्या जिल्ह्यात दोन्ही जागांवर शिवसेनेचे खासदार आहेत, त्याच जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीने 2019 मध्ये शिवसेना-भाजपचे सर्व उमेदवार पाडले, केवळ प्रकाश आबिटकर यांना शिवसेनेच्या तिकिटावर जिंकता आलं.
सतेज पाटील यांचा झंझावात मग पुढेही सुरु राहिला. पुणे शिक्षक आमदार निवडणुकीत, तुम्ही फक्त उमेदवार द्या, निवडून आणायची जबाबदारी माझी असा शब्द सतेज पाटील यांनी काँग्रेस श्रेष्ठींना दिला होता. त्यानुसार काँग्रेसचे प्रा. जयंत आसगावकर यांना विजयी करुन, सतेज पाटील यांनी आपला दबदबा कायम राखला होता.
सतेज पाटील यांचा झंझावात
2015- कोल्हापूर महापालिकेत विजय
2019 - जिल्हाध्यक्ष म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे 4 आमदार विजयी
2020 - पुणे शिक्षक आमदार निवडणूक विजय
2021 - कोल्हापूर विधानपरिषद बिनविरोध
2021 - गोकुळ दूध संघ पॅनल विजयी
2022 - कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक
सतेज पाटील हे काँग्रेसचा विजयाचा वारु उधळत असले, तरीही त्यांना काँग्रेसकडून राज्यमंत्रीपदच दिलं गेलं. 2009 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आल्यानंतर ते गृहराज्यमंत्री होते, त्यानंतर आता 2019 मध्ये महाविकास आघाडी आल्यानंतर काँग्रेसने त्यांना प्रमोशन न देता राज्यमंत्रीपदच दिलं. एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावरुनच टोला लगावला होता. सतेज पाटलांनी वयाची पन्नाशी पार केली, तरी राज्यमंत्रीच आहेत, असं अजित पवार म्हणाले होते. आता कोल्हापूरच्या विजयानंतर तरी सतेज पाटील यांना काँग्रेस प्रमोशन देतं का हे पाहावं लागेल.