रविवारी रात्री विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या .
प्रेस मीडिया लाईव्ह :
पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरूच रविवारी रात्री विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत.सांगली जिह्यात तासगाव तालुक्यातील हातनोली येथे घर पडून महिलेचा मृत्यू झाला आहे. तर, दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. सातारा जिह्यातील माणच्या पूर्वेकडील भागात शेतपिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर सोलापूर जिह्यातील उत्तर सोलापूर आणि सांगोला तालुक्यातही पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे.
तासगाव तालुक्यातील हातनोली येथे रविवारी मध्यरात्री 11 वाजता झालेल्या वादळी वाऱयामुळे घर पडून त्यामध्ये कमल नारायण माळी (70) या महिलेचा मृत्यू झाला, तर नारायण माळी (85) व दीपक माळी (25)हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. हातनोली गावात बामणी गावालगत नारायण माळी यांचे घर आहे. रविवारी रात्री वादळी वाऱयामुळे माळी यांचे घर पडले. घरावरील पत्रे 200 मीटर लांब जाऊन पडले. घराच्या भिंती पडल्यामुळे त्याखाली तिघे जण सापडले.
सांगोला तालुक्यातील 5 गावांत वीज पडून 5 म्हशी, एक बैल, एक खिलार खोंड, एक खिलार गाई व दोन शेळ्या अशी दहा जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. तर, गौडवाडी येथील हेमाडपंथीय महादेव मंदिराला तडे गेले आहेत.