कोणी तुम्हाला भोंगा सांगत असेल, तर त्यांना महागाईबद्दल विचारा...जयंत पाटील
प्रेस मीडिया लाईव्ह :
इस्लामपूर : भारत धर्मांधतेकडे वाटचाल करीत असून, आपला पाकिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. ते म्हणाले ,"आज महाराष्ट्रात द्वेषाचे राजकारण केले जात आहे. कोणी तुम्हाला भोंगा सांगत असेल, तर त्यांना महागाईबद्दल विचारा."येथील जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात आयोजित राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार अमोल मेटकरी, युवा नेते प्रतिक पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, विद्यार्थी सेलचे सुनील गव्हाणे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर प्रामुख्याने उपस्थित होते.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, धर्मांधता कधीही विकासाचा मार्ग दाखवू शकत नाहीत. आपल्या आजू-बाजूचे देश धर्मांधतेकडे झुकले आणि उध्वस्त झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर आयुष्यात एकमेव वार झाला. तो कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी केला. समाजाला सतावणारे प्रश्न बाजूला सारले जात आहेत. जाणीवपूर्वक महागाई, बेरोजगारी, बंद पडणारी कारखानदारी, शिक्षणाचे खाजगीकरण हे ज्वलंत प्रश्न बाजूला ठेवले जात आहेत.
जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व जाती-धर्माचा असून, उद्याचा महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील तरुण पिढीला पुढे आणण्याचे काम आम्ही करीत आहोत.येत्या २३ एप्रिलला कोल्हापूर येथील तपोवन मैदानात खासदार शरद पवारसाहेब यांच्या उपस्थितीत संवाद यात्रेच्या समारोपाची संकल्प सभा होणार आहे.
धनंजय मुंडे म्हणाले, राज ठाकरे हे भाजपाचे अर्धवटराव आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा राजकारणाचा नव्हे,तर श्रद्धेचा विषय आहेत. पवारसाहेब हे छत्रपतींना अभिप्रेत रयतेचे राजकारण करीत आहेत. त्यांनी अठरा पगड जातीतील कार्यकर्त्याना संधी दिली. त्यांना जातीयवादी म्हणता? जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील प्रथम क्रमांकाचा पक्ष होईल. येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे १०० आमदार निवडून येऊन राज्याचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होईल.
अमोल मेटकरी म्हणाले, शरद पवार यांच्या ह्रदयात छत्रपती आहेत. तुम्हाला शाहू, फुले, आंबेडकर यांची इतकी ऍलर्जी का? हनुमान चालिसा, हनुमान स्तोत्र आमच्या तोंडपाठ आहेत. भाजपवाल्यांनी आम्हाला धर्म व भक्ती शिकवू नये. तुम्ही अयोध्याला जाताना केंद्राची झेड प्लस सुरक्षा कवच घेऊन कशाला जाता? यावेळी त्यांनी स्व.अटलबिहारी वाजपेयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारसाहेब यांच्याबद्दल काढलेले गौरवोद्गार व्हिडिओ लावल्या.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, जयंतराव पाटील संवाद यात्रेतून महाराष्ट्रातील माणूस जोडत संघटना व कार्यकर्त्यांना सन्मान दिला आहे. यावेळी मेहबूब शेख, रविंद्र वरपे, सुनील गव्हाणे, सक्षणा सलगर यांचीही भाषणे झाली.पाटील, तसेच मंत्री व नेत्यांचे पंचायत समितीसमोर जोरदार स्वागत करून मोटारसायकलने कचेरी चौकात आणले. येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरुवातीस युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सर्व सेलचे अध्यक्ष व सदस्यांची हजेरी घेवून कामाचा आढावा घेतला.
प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी आभार मानले. यावेळी सदानंद गाडगीळ संदीप तांबवेकर यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार मानसिंग नाईक, दिलीपतात्या पाटील, आ. अरुण लाड, सारंग पाटील, सुरेश पाटील, राजू जानकर, पी. आर. पाटील, शामराव पाटील, विनायक पाटील, वैभव शिंदे, अविनाश पाटील, ऍड. बाबासाहेब मुळीक, बाळासाहेब पाटील, ऍड. चिमन डांगे, देवराज पाटील, खंडेराव जाधव, अरुण कांबळे, सुस्मिता जाधव, सुनीता देशमाने, पै.भगवान पाटील, शरद लाड, शुभागी पाटील यांच्यासह जिल्हा संघटनेचे पदाधिकारी तसेच वाळवा तालुक्यातील सहकारी संस्थांचे व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.