जमिनीवरील प्रश्नांना केंद्रस्थानी आणणे हीच बाबासाहेबांना आदरांजली.... प्रसाद कुलकर्णी यांचे मत



प्रेस मीडिया लाईव्ह :

इस्लामपूर ता.२०, मनुष्यनिर्मित चातुर्वर्ण्य  व्यवस्थेचा दाह संपत नाही तोपर्यंत,भारतीय संविधानाच्या तत्वज्ञानाची सार्वत्रिक प्रस्थापना होऊन वैश्विक समता नांदेपर्यंत आणि  हवेतील प्रश्नांपेक्षा जमिनीवरील प्रश्नांना राजकारण व समाजकारणाच्या केंद्रस्थानी अग्रक्रम मिळेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रस्तुतता कायम राहील.आज बेरोजगारी पासून महागाईच्या उड्डाणी आगडोंबा ऐवजी चालिसा आणि भोंगा याचीच चर्चा घडविणारे विकृत राजकारण मुद्दाम घडवून आणून बाबासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली जात आहे.अशावेळी माणसाचा माणूस म्हणून विचार व विकास करण्याचा आणि तो कृतीत आणण्याचा आग्रह धरणे हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली ठरेल असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालय, इस्लामपूर येथे डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यानात बोलत होते .'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची समकालीन प्रस्तुतता ' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.विलास काळे होते.स्वागत व प्रास्ताविक प्रा.डॉ.सचिन पाटील यांनी केले.पाहुण्यांचा परिचय कल्याणी जोशी यांनी करून दिला.प्रा.डॉ.रमेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले, आज लोकशाहीचे नाव घेऊन,तिचा आधार घेऊन मनमानी पद्धतीचा कारभार केला जात आहे. आंबेडकरांची लोकशाहीची भूमिका व्यापक होती.त्यांच्या लोकशाहीच्या संकल्पनेत सामाजिक समतेला प्राधान्य होते.  प्रातिनिधिक लोकशाही कडून सहभागी लोकशाहीकडे वाटचाल बाबासाहेबांना अभिप्रेत होती.राजकीय सत्ता हवी पण ते अंतिम औषध नाही तर सामाजिक उन्नतीतच मुक्ती आहे असे ते  मानत.संवैधानिक मूल्ये गुंडाळून ठेवून आजचे राजकारण केवळ आणि केवळ सत्ताकारण बनल्याच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांची महानता अधिक ठळक होते.प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या ओघवत्या शैलीतील सविस्तर भाषणात डॉ.आंबेडकरांच्या विचारांची सार्वकालिक प्रस्तुतता मांडली.

अध्यक्षस्थाना वरून बोलतांना प्राचार्य डॉ.विलास काळे म्हणाले, डॉ.आंबेडकर यांची उक्ती व कृती याचा समकालीन संदर्भ मोठा आहे.समाजातील शेवटच्या माणसाचे उत्थान करायचे असेल तर त्यांच्या विचारांचा अंगीकार करावा लागेल.या व्याख्यानास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.मनस्वी साळुंखे यांनी आभार मानले.सोनाली जगताप यांनी सूत्रसंचालन केले.

Post a Comment

Previous Post Next Post