कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण..
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेच्या महिला बचत गटाच्या समन्वयक व सामाजिक कार्यकर्त्या नजमा गुलाब शेख यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ‘गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार’ प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.नुकताच मुंबई येथे झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्यासह कामगार खात्याचे अधिकारी व विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
इचलकरंजी शहरातील नजमा शेख या सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.या माध्यमातून महिलांवरील अन्याय अत्याचार रोखतानाच सर्वसामान्य वर्गाला न्याय मिळवून देण्याचा त्यांचा कायम प्रयत्न राहिला आहे.याशिवाय महिला दक्षता समितीच्या माध्यमातून देखील त्यांनी सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. मागील १५ वर्षांपासून त्या सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेत महिला बचत गटाच्या समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे व माजी नगराध्यक्षा सौ. किशोरी आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या काम करत आहेत. महिलांनी स्वावलंबी बनून स्वत:च्या पायावर उभे रहावे यासाठी बँकेच्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. याद्वारे आजवर तब्बल 1800 बचत गट बँकेशी जोडले गेले आहेत. आवाडे जनता बँकेच्या माध्यमातून विविध उद्योग-व्यवसायांसाठी कर्जपुरवठा करुन त्यांना उद्योजिका बनविले जात आहेत. यामध्ये नजमा शेख या समन्वयक म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहेत. यामध्ये त्यांना संचालक स्वप्निल आवाडे, माजी सीईओ विजय कामत तसेच विद्यमान सीईओ संजय शिरगांवे यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. शेख यांच्या या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने त्यांची गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.नुकताच मुंबई येथे एका शानदार समारंभात कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नजमा शेख यांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.यावेळी कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू उपस्थित होते. हा पुरस्कार नजमा शेख यांनी आपल्या मातोश्री चांदबी शेख व कुटूंबातील सदस्यांसमवेत स्विकारला.
या पुरस्कार सोहळ्यास कामगार खात्याचे अधिकारी आदींसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.