मागण्यांची कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथे सर्व दिव्यांग व्यक्तींना मासिक 15 हजार रुपये पेन्शन द्यावे , सरकारी नोकरीत समाविष्ट करून घ्यावे यासह विविध मागण्यांसाठी दिव्यांग कल्याण सेवाभावी संस्थेच्यावतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी दिव्यांग मोर्चेकऱ्यांनी विविध मागण्यांच्या घोषणा देत मागणीचे निवेदन प्रांत कार्यालयात शिरस्तेदार संजय काटकर यांना दिले.तसेच मागण्यांची कार्यवाही न झाल्यास प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला.
केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकार समाजातील दिव्यांगाच्या विविध मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी शासनाकडे साकडे घालत आहेत. मात्र वेळोवेळी दिव्यांगाचे प्रश्न शासन बेदखल करत आहे. त्यामुळे इचलकरंजी येथे दिव्यांग कल्याण सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध मागण्यासाठी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सर्व दिव्यांग बांधव गांधी पुतळा चौकात एकञ येवून आपल्या मागण्यांबाबत जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा प्रांत कार्यालयावर आणण्यात आला.या वेळी
दिव्यांगांचे संरक्षण विधेयक कायदा करण्यात यावा अशी ठाम मागणी मोर्चाद्वारे करण्यात आली. सर्व दिव्यांगांना कुवतीप्रमाणे सरसकट सरकारी नोकरी मिळावी, सरसकट मासिक पंधरा हजार पेन्शन मिळावी, शिक्षणात शंभर टक्के सवलत मिळावी,हेल्थ कार्डवर खाजगी दवाखान्यात मोठ्या खर्चासाठी पाच लाख रुपये मिळावेत, शहरात शासकीय अथवा नगरपालिकेच्या जागेवर दिव्यांगांसाठी भवन बांधून द्यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन प्रांत कार्यालयात शिरस्तेदार श्री. काटकर यांना दिले.
केंद्र व राज्य शासनाने दिव्यागांच्या प्रलंबित मागण्यांची कार्यवाही न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील देण्यात आला. या मोर्चात अनिल पाटील, प्रकाश शानवाडे, नाना दातार, बाळासो कुरणे ,सुधीर लोले, सदाशिव गडाळे, वाहिद शेख, रंजीता खटावकर, सुधीर लोले, रविराज पोवार, सुशांत पाटील ,प्रमोद मुंगळे, सुनील कटारे यासह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.