प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी प्रतिनिधी :
गृहोपयोगी साहित्य, इलेक्ट्रिक वाहने आणि दैनंदिन वापराच्या उपयोगी वस्तू उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेतून एकाच छताखाली रोटरी ट्रेड फेअरच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या ट्रेड फेअरचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी केले.
इचलकरंजी रोटरी क्लबच्यावतीने स्टेशन रोडवरील केएटीपी ग्राउंडवर 21 ते 25 एप्रिल या कालावधीत रोटरी ट्रेड फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रांताधिकारी डॉ. खरात बोलत होते. विविध सामाजिक उपक्रमात रोटरी क्लब सातत्याने अग्रेसर असते. कोरोना काळातील या सामाजिक संस्थेचे कार्य उल्लेखनीय होते. अशा सामाजिक उपक्रमातूनच रोटरीतर्फे ट्रेड फेअर भरविण्यात आले आहे. रोटरी क्लबचा हा सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी सांगितले.
यावेळी पोलिस उपाधिक्षक बाबुराव महामुनी यांनी, मागील दोन वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ट्रेड फेअर भरवता आले नव्हते. मात्र , यंदा नियोजन पद्धतीने भरविण्यात आलेल्या ट्रेड फेअरमुळे नागरिकांना खरेदीसाठी चांगली संधी असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
रोटरीचे अध्यक्ष प्रकाश रावळ यांनी स्वागत केले. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रोटरीचे सत्यनारायण धूत, अभय यळरुटे ,संजय घायतिडक ,मनिष मुनोत ,अभय यळरुटे ,प्रकाश गौड , मुकेश जैन , वसंत पाटील , अजित कुरडे , महेंद्र मुथा ,विक्रम बुचडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.