तातडीने कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलनाचा मराठी एकीकरण समितीचा इशारा...
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी / प्रतिनिधी
शासनाने व्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून स्थानिक बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देण्याची कायद्यात तरतूद आहे.असे असूनही इचलकरंजी नगरपरिषद प्रशासनाकडून शहरात प्रशिक्षण केंद्र उभारुन गरजूंना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात कमालीची उदासिनता दिसून येत आहे.याबाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मराठी एकीकरण समितीचे जिल्हाध्यक्ष अमित कुंभार यांनी दिला आहे.
मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी शहर परिसरात शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कामकाजात मराठी भाषेचा वापर व त्याच्या संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत.याशिवाय शासकीय, निमशासकीय कार्यालयावरील इंग्रजी व अन्य भाषेतील फलक काढून सर्व कामकाज हे मराठी भाषेतून व्हावे , यासाठी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन , मोर्चे काढून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे.विशेष म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या काळात या समितीच्या माध्यमातून स्थानिक सुमारे १५० युवकांना मोफत अत्याधुनिक रॅपिअर,एअरजेट यासारखे यंञमाग चालवण्याचे प्रशिक्षण देत त्यांना रोजगार मिळवून दिला आहे.यातून सदर युवकांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग गवसला आहे.तर दुसरीकडे कायद्यात तरतूद असून देखील स्थानिक बेरोजगार युवकांना व्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात इचलकरंजी नगरपरिषद प्रशासनाची कमालीची उदासिनता दिसून येत आहे.याबाबत मराठी एकीकरण समितीचे जिल्हाध्यक्ष अमित कुंभार , रोहित घाटगे , बाळकृष्ण धुपदाळे ,प्रकाश जाधव , गणेश शिंदे , विनायक पवार ,चंद्रकांत टिपुकले , सचिन पाटील ,प्रविण रेड्डे यांच्यासह सर्व सहका-यांनी जोरदार आवाज उठवून प्रशासनाबरोबरच शासन व लोकप्रतिनिधींना जाग आणण्याचा प्रयत्न केला आहे.याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी इचलकरंजी नगरपरिषदेने कायद्यातील तरतुदीनुसार व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरु करुन त्या माध्यमातून
स्थानिक बेरोजगार युवकांना अत्याधुनिक यंञमागाचे प्रशिक्षण देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी ,अशी मागणी नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.तर दुसरीकडे नगरपरिषद प्रशासनाने केवळ दिखाव्यासाठी महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरु केल्याचा आरोप देखील होवू लागला आहे.यामागचे मूळ शोधून काढल्यास बरेच काही उघड होणार असल्याची चर्चा सध्या शहरात जोरदार सुरु आहे.याच आशयाचे निवेदन इचलकरंजी अप्पर तहसील कार्यालय ,प्रांत कार्यालयास सादर केले आहे .असे असूनही याबाबत अद्याप कोणतीच कार्यवाही होत नसल्याने प्रशासनात व्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारुन स्थानिक बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देण्यात कमालीची उदासिनता असल्याचे आता लपून राहिलेले नाही.त्यामुळे प्रशासनाच्या या गलथान कारभाराबाबत स्थानिक बेरोजगार युवकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.त्याचबरोबर जनतेच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर मराठी एकीकरण समिती अधिक आक्रमक होण्याच्या भूमिकेत दिसत आहे.
याबाबत शासनाच्या निर्देशानुसार प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मराठी एकीकरण समितीचे जिल्हाध्यक्ष अमित कुंभार यांनी दिला आहे.