तराफा चित्रपट ६ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

इचलकरंजीचे अविनाश कुडचे यांचे निर्माता म्हणून चित्रपट क्षेञात आगमन


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी

अनोख्या टायटलमुळे सुरुवातीपासूनच रसिकांपासून जाणकारांपर्यंत चर्चेचा विषय ठरलेला आणि इचलकरंजीचे सुपूञ असलेले व मराठी चित्रपट क्षेञात नव्यानं आगमन केलेले निर्माते अविनाश कुडचे यांचा'तराफा' हा चित्रपट ६ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. आजवर बऱ्याच कारणांमुळे हा चित्रपट लाइमलाईटमध्ये राहिला आहे. उत्सुकता वाढवणारं पहिलं पोस्टर, त्या मागोमाग यात नवी जोडी झळकणार असल्याची आलेली बातमी आणि सुमधूर गीत-संगीताच्या बळावर 'तराफा'नं प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण करण्याचं काम केलं आहे. आता प्रत्यक्षात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यानं उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 

इचलकरंजीचे सुपूञ असलेले निर्माते अविनाश कुडचे यांनी भूमि प्रोडक्शन या बॅनरखाली 'तराफा'ची निर्मिती केली आहे. सुबोध पवार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'तराफा' असं खूप वेगळं टायटल या चित्रपटाला का देण्यात आलंय, यात नवीन कलाकारांची जोडीच का घेण्यात आलीय, कथानकात नेमके कोणकोणते नवे पैलू सादर करण्यात आलेत, हा चित्रपट नेमका कोणत्या मुद्द्यावर भाष्य करणार आहे या अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्येच मिळणार आहेत. अश्विनी कासार आणि पंकज खामकर ही नवी कोरी जोडी प्रेक्षकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे. त्यांचा अभिनय आणि केमिस्ट्री यात अनुभवायला मिळणार आहे. दोघेही प्रथमच या चित्रपटामध्ये एकत्र आले असले तरी अभिनयाची शिदोरी दोघांच्याही गाठीशी आहे. अश्विनी आणि पंकज या जोडीसोबत या चित्रपटात दिलीप डोंबे, श्रावणी सोळसकर, मिलिंद दास्ताने, प्रियंका कासले, शशांक दरणे, अरविंद धनु, शिवाजी रेडेकर, राजेंद्र जाधव, नरेंद्र जाधव, परी पिंपळे, अनिता कुलकर्णी, कविता चव्हाण, विजय जाधव, गजानन कराळे, बाबासाहेब काटे, अर्जुन खटावकर यांच्या जोडीला बालकलाकार भूमी अविनाश कुडचे, गौरी अविनाश कुडचे यांच्याही भूमिका आहेत. या कलाकारांना सुबोध पवार यांच्या कल्पक दिग्दर्शनाची सुरेख साथ लाभली आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजन करणारा नसून, काहीतरी सूचना देणारा तसेच संदेश पोहोचवणाराही असल्याचं पवार यांचे म्हणणे आहे. 'तराफा'च्या संपूर्ण टिम केलेल्या मेहनतीच्या बळावर आणि निर्मात्यांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळे दर्जेदार निर्मितीमूल्ये असणारा आशयघन चित्रपट तयार करू शकल्याचे समाधानही पवार यांनी व्यक्त केले आहे.


सुबोध पवार यांनी दिग्दर्शनासोबतच 'तराफा'ची कथा, पटकथा, संवाद आणि गीतलेखनही केलं आहे. त्यामुळे लेखकाच्या मनातील जसेच्या तसे चित्र दिग्दर्शकाने मोठ्या पडद्यावर रेखाटल्याचे पहायला मिळणार आहे. सिनेमॅटोग्राफी राजा फडतरे यांनी केली असून, निलेश गावंड यांनी संकलन केले आहे. गीतलेखन सुबोध पवार आणि अमृता यांनी केले असून, विजय गटलेवार, जयश्री करंबेळकर, विवेक नाईक यांनी या गीतरचनांना सुमधूर स्वर दिला आहे. गायक-संगीतकार विजय गटलेवार यांनीच गायनासोबतच संगीत दिग्दर्शनही केले आहे. कोरिओग्राफी प्रदीप कार्लेकर आणि शार्दुल कुंवर यांची आहे. केशव ठाकूर यांनी कला दिग्दर्शन केले असून, मनाली भोसले यांची केशभूषा आहे. वेशभूषा शाऊल गटलेवार यांनी केली असून, रंगभूषा संतोष भोसले यांनी केली आहे. महेश जी. भारंबे कार्यकारी निर्माते, तर सुधीर मेश्राम या चित्रपटाचे मुख्य सहाय्यक दिग्दर्शक आहेत.एकंदरीत ,सुमधूर गीत-संगीताच्या बळावर 'तराफा'नं प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण करण्याचं काम केलं आहे. आता प्रत्यक्षात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यानं उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post