इचलकरंजीत दिव्यांग कल्याण सेवाभावी संघटनेचा प्रांत कार्यालयावर मोर्चा

 विविध प्रलंबित मागण्यांचे नायब तहसीलदारांना निवेदन सादर


इचलकरंजी येथे दिव्यांग कल्याण संघटनेच्या वतीने दिव्यांग बांधवांना विविध आजारांवरील उपचारासाठी शासनाने१० हजार रुपये बॅंक खात्यात जमा करावे ,यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी विविध मागण्यांचे निवेदन प्रांत कार्यालयात नायब तहसीलदार संजय काटकर यांच्याकडे सादर करण्यात आले.तत्पूर्वी ,दिव्यांग बांधवांनी प्रांत कार्यालय चौकापासून मोर्चास सुरुवात केली.यावेळी मोर्चातील दिव्यांग बांधवांनी विविध मागण्यांच्या जोरदार घोषणा देत प्रांत कार्यालय परिसर दणाणून सोडला.

केंद्रा बरोबरच राज्य शासनाच्या दुर्लक्षामुळे दिव्यांग बांधव हा घटक वंचित व उपेक्षित राहिला आहे.या घटकांना शासनाच्या मुलभूत सोयी सुविधांचा लाभ मिळत नसल्याने त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.आपल्या न्याय हक्कासाठी दिव्यांग बांधव सातत्याने लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन, मोर्चे काढून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करत आहेत.असे असूनही दिव्यांग बांधवांना न्याय मिळण्याची आशा धुसर बनत चालली आहे.त्यामुळे दिव्यांग कल्याण सेवाभावी संघटनेच्या वतीने इचलकरंजी येथे विविध प्रलंबित मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करत

प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी शिष्टमंडळाने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन प्रांत कार्यालयात नायब तहसीलदार संजय काटकर यांच्याकडे सादर केले.यामध्ये दिव्यांग बांधवांना किरकोळ आजारांवरील उपचारासाठी १० हजार रुपये बॅंक खात्यात जमा करावेत , गंभीर आजारांवरील उपचारासाठी राष्ट्रीय आरोग्य योजनांतर्गत ५ लाख रुपये खर्चाची तरतूद करावी , कुवतीनुसार शासकीय नोकरी मिळावी , मासिक १५ हजार रुपये पेन्शन मिळावी ,६० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाण असलेल्या दिव्यांगांना मासिक १५ हजार रुपये पेन्शन मिळावी ,शिक्षणात १०० टक्के सवलत मिळावी ,रेल्वे सवलतीचे ऑनलाईन स्मार्ट कार्ड सुरु करावे , घरकुल योजनेचा लाभ मिळावा , अंत्योदय पिवळे रेशनकार्डच्या सुविधांचा लाभ मिळावा ,यासह विविध प्रलंबित मागण्यांचा समावेश आहे.

यावेळी नायब तहसीलदार संजय काटकर यांनी सदर प्रलंबित मागण्या शासनाला कळवून त्याच्या कार्यवाहीसाठी निश्चित प्रयत्न करु ,असे शिष्टमंडळाला दिले.

या मोर्चामध्ये दिव्यांग कल्याण सेवाभावी संघटनेचे संस्थापक अनिल पाटील , राजकुमार गेजगे , रोहित कागले , सदाशिव गदाळे , जुबेर पटवेगार , विनायक निकम , गणेश परमणे , अमित महाजन ,सौ.एम.एम.जगताप ,सुमैय्या सय्यद , निवृत्ती भांदिगरे , पृथ्वीराज माने , गंगुबाई कोरवी ,वाजीद गैबान ,निफावर मुजावर ,रसिक मुजावर ,सतीश पाटील , दाऊद बाणदार ,प्रकाश काटकर ,अजिंक्य कचरे यांच्यासह अन्य दिव्यांग बांधवांचा समावेश होता.

Post a Comment

Previous Post Next Post