मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांचा राजीनामा

राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे मनसेला धक्क्यामागून धक्के बसू लागले आहेत.

प्रेस मीडिया लाईव्ह :

डोंबिवली : भोंगा प्रकरणी राज ठाकरे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका मनसेसाठी महागात पडलीय. या मुळे मनसे नेत्यांचे राजीनामा सत्र सुरु झाले आहे. आता मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी राजीनामा दिला आहे.मशिदीवरील भोंग्यांना राज ठाकरे यांनी विरोध केला आहे. भोंगे काढण्यासाठी त्यांनी राज्य सरकारला डेडलाइन दिली आहे. पण राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे मनसेला धक्क्यामागून धक्के बसू लागले आहेत. राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर नाराजी दर्शवत मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी मनसे पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.


एका बाजूने समाजात कुचंबणा आणि दुसरीकडे पक्षात अस्थिर वातावरण त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याने कोणाकडे आपल्या भावना सांगाव्या ? खूप जड अंतकरणाने मी राजीनामा सोपविला आहे. माझे कुटूंब आणि समाज यापुढे मी हतबल आहे. ज्या कुटुंबातील व्यक्तींनी मला आपल्या सोबत काम करण्याची प्रेरणा दिली तेच आज तुमची साथ सोडण्याची सूचना करत आहे. 16 वर्षात आजच आपल्याला अजान, मशीद, मदरसे यांच्यावर अचानक संशय आला. आम्ही तुमच्या सोबत असतांना तुम्ही आम्हाला का नाही या गोष्टी बोललात आम्ही याचा सोक्षमोक्ष आपल्या समोर केला असता परंतू ते झाले नाही. ब्लू प्रिंट, विकासाच्या भव्य दिव्य कल्पना एक दिवशी अचानक मशिदींवरील भोंगे आणि मदरस्यावर येऊन थांबतात तेव्हा मनसेचा एक कार्यकर्ता म्हणून काहीतरी चुकीचं घडतंय हे सहज लक्षात येऊन जाते असेही ते म्हणतात.

मदरसांमध्ये काही चुकीचे घडत असेल तर माझ्यासोबत चला मी दाखवतो मदरसे..मात्र बदनामी का? मुस्लिम द्वेषाच्या धंद्यांवर ज्यांचे राजकारण चालतं.त्यांना मस्जिदच्या भोंग्या पासून त्रास होतो,मदरस्यानां बदमान करायचं काम त्यांचं आहे.अश्या शक्तींच्या मागे आपल्याला जायची गरजच का आली ? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला का असल्या राजकारणाची गरज का पडली..? असे प्रश्न देखील शेख यांनी राज यांना विचारले आहेत.

मुस्लिम समाज तसेच मराठी समाजात इरफान यांचे एक वेगळेच स्थान असून त्यांना मानणारा वर्ग आहे. मात्र आता मनसे पक्षानेच अशी भूमिका घेतल्याने मुस्लिम बांधव मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून याविषयी विचारणा करीत असून त्यांच्यात नाराजी आहे. अखेर समाजासोबत जाण्याचे ठरवित शेख यांनी आपला राजीनामा पक्षाकडे सोपविला आहे. यावर आता कार्य निर्णय होतो हे पहावे लागेल.

Post a Comment

Previous Post Next Post