नेटकऱ्यांनी पुन्हा त्याला धारेवर धरले असून त्याची एक सिगारेटची जुनी जाहिरात व्हायरल केली आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
अक्षय कुमार, शाहरुख खान व अजय देवगण यांची विमलची जाहिरात झळकली आणि एकच गोंधळ उडाला. सामाजिक गोष्टींवर आपल्या चित्रपटातून जनजागृती करणाऱ्या अक्षयने तंबाखूची जाहिरात केली हे पाहून चाहते चांगलेच खवळले.नेटकऱ्यांनी अक्षयला फटकारत त्याला ट्रोल केले. नेटकऱ्यांचा रोष पाहून अक्षयकुमारने तत्काळ सोशल मीडियावरून माफीनामा जाहीर केला. या माफिनाम्यात अक्षयने एक वक्तव्य केलं आहे. त्यात तो म्हणाला की मी कधीच तंबाखूचं प्रमोशन केलं नाही आणि कधी करणारही नाही. त्याच्या या वक्तव्यावरून नेटकऱ्यांनी पुन्हा त्याला धारेवर धरले असून त्याची एक सिगारेटची जुनी जाहिरात व्हायरल केली आहे.
या जुन्या जाहिरातीत अक्षय कुमार रेड अँड व्हाईट या सिगारेटचे प्रमोशन करत आहेत. त्याच्या हातात एक सिगारेट देखील दिसत आहे. सोबत 'रेड अँड व्हाईट पिणाऱ्यांची बातच काही और असते', अशी टॅगलाईन आहे. ही जाहिरात नेटकऱ्यांनी शेअर करत त्याला पुन्हा एकदा सवाल केले आहेत. अक्षयचे खोटे पकडले गेल्यामुळे नेटकऱी त्याला ट्रोल करून लागले आहेत.
अक्षय कुमार याची विमल इलायचीची जाहिरात काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाली होती. यात शाहरुख खान आणि अजय देवगन विमल युनिव्हर्समध्ये अक्षय कुमार याचे स्वागत करताना दिसतात. हे तिन्ही मोठे स्टार पहिल्यांदाच एखाद्या जाहिरातीमध्ये एकत्र आले होते. मात्र तंबाखूची जाहिरात करणाऱ्या या स्टार्सला नेटकऱ्यांनी धारेवर धरले. विशेषत: अक्षय कुमार याच्यावर नेटकरी तुटून पडले. त्याचे जुने व्हिडीओ देखील नेटकऱ्यांनी शेअर केले. यात तो दारु, सिगारेटसारख्या हानिकारक गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला देताना दिसतोय. नेटकऱ्यांनी या सर्व स्टार्सकडून पद्मश्री सन्मान मागे घेण्याची मागणीही केली आहे.