महत्वाची बातमी : देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात याचिका दाखल करणारे ...

अ‍ॅड. सतीश उके यांंच्यासह त्यांचे बंधु प्रदीप उके यांना ईडीने ताब्यात घेतले..

प्रेस मीडिया लाईव्ह :

 देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात याचिका दाखल करणारे वकील अ‍ॅड. सतीश उके यांंच्यासह त्यांचे बंधु प्रदीप उके यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. सकाळपासून उके यांच्या घराची ईडीकडून झाडा झडती सुरू होती.जमिनीच्या व्यवहारा संबंधी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.

अॅड. सतीश उके यांच्या गुरुवारी सकाळी घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) धाड टाकली होती. अ‍ॅड सतीश उके यांच्या नागपुरातील रामेश्वरीमधील घरी गुरुवारी सकाळी ईडीचे पथक पोहोचले आणि झाडाझडती सुरू केली. ईडीचे पाच ते सहा अधिकारी येथे पोहोचले आणि तब्बल सहा तास छापेमारी सुरू होती.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज भरताना दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर करण्यात आला होता आणि या प्रकरणी नागपूरमधील वकील अॅड सतीश उके यांनी न्यायालयात धाव घेतली होती. तसेच नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात जी निवडणूक याचिका दाखल केली होती त्यातही सतीश उके यांचा पुढाकार होता. नाना पटोले यांचे वकील म्हणून त्यांनी काम पाहिले.

फडणवीस नागपूरचे महापौर असताना त्यांनी एका जमिनीच्या प्रकरणात काही निर्णय घेतले होते. त्यासंदर्भातच त्यांच्या विरोधात दोन खटले दाखल झाले होते. त्या प्रकरणांत फडणवीस यांना जामीन मिळवला होता. मात्र, त्यांनी विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात या दोन्ही प्रकरणांचा उल्लेख केला नाही.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर दोन वर्षांपूर्वी 2019 मध्ये ही याचिका दाखल करण्यात आली होती. नागपूरमधील सामाजिक कार्यकर्ते मोहनीश जीवनलाल जबलपुरे यांनी वकील सतीश उके यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल केली होती

Post a Comment

Previous Post Next Post