सुत्रधारा सह दलाला अटक , तर दोन तरुणींची सुटका
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे शहर प्रतिनिधी : जिलानी उर्फ मुन्ना शेख :
पुणे: पुणे पोलिसांनी पर्यटन व्यवसायाच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या परराज्यातील टोळीचा पर्दाफाश केला. येरवडा व विमाननगर परिसरात हा प्रकार सुरु असताना सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने सुत्रधारा सह दलाला अटक केली.तसेच दोन तरुणींची सुटका करण्यात आली .
या बाबतची सविस्तर माहिती अशी की, कुलदिप प्रसाद मोहन प्रसाद महतो (वय 26, रा. डोंगरीपाडा, ठाणे, मुळ रा. झारखंड), जयशंकर प्रसाद रमेश साव (वय 20, रा. जकॉब सर्कल मुंबई, मुळ रा. झारखंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पर्यटनाचा व्यवसाय करणाऱ्या कारचा उपयोग करुन काही व्यक्ती शहरातील वेगवेगळ्या भागात वेश्या व्यवसायासाठी तरुणींना आणत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकास मिळाली त्यानुसार, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी या माहितीची खातरजमा केली. त्यानंतर विभागाच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करुन दोन्ही संशयित आरोपींचा मोबाईल क्रमांक मिळविला. त्या नंतर बनावट ग्राहकाद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला. दरम्यान, आरोपींनी संबंधित ग्राहकास विमाननगर परिसरातील एका हॉटेलमध्ये खोल्या घेण्यास सांगितले. त्यानुसार, ग्राहकाने रूमची नोंदणी केली.त्यानंतर पोलिस निरीक्षक माने, पोलिस उपनिरीक्षक श्रीधर खडके, पोलिस कर्मचारी राजेंद्र कुमावत, राजश्री मोहिते, मनिषा पुकाळे, अण्णा माने, प्रमोद मोहिते, हणमंत कांबळे यांच्या पथकाने सोमवारी संबंधित हॉटेल भोवती सापळा रचला. त्यानंतर सायंकाळी "टुरीस्ट व्हेईकल' असा उल्लेख असलेली कार तेथे दाखल झाली. त्याच वेळी पोलिसांनी संबंधित कारमधुन उतरलेल्या महतो, साव यांना ताब्यात घेण्यात आले, तर त्यांच्यासमवेत असलेल्या दोन तरुणींची सुटका करण्यात आली. महतो व साव यांच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यावेळी ते "टुरिस्ट व्हेईकल' चालवित असल्याचे भासवून परराज्यातील महिला, तरुणीं कडून जबरदस्तीने वेश्या व्यवसायास करून घेत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली. या बाबत पोलिसांनी दोघांना अटक केली.