इंधन दरवाढीने महागाईचा आगडोंब उसळला असून त्यात जनतेची होरपळ सुरू झाली आहे..
प्रेस मीडिया लाईव्ह :
देशात विधानसभा निवडणुका संपताच ठिणगी पडलेल्या इंधन दरवाढीचा धडाका सुरूच राहिला असून मागील नऊ दिवसांत तब्बल आठवेळा दरवाढ झाली. त्यामुळे या काळात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर 5.60 रुपयांची वाढ झाली आहे. बुधवारीही पेट्रोल-डिझेल प्रत्येकी 80 पैशांनी महाग झाले.या इंधन दरवाढीने महागाईचा आगडोंब उसळला असून त्यात जनतेची होरपळ सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणुका संपण्याआधी काही महिने इंधनाचे दर 'जैसे थे' राहिले होते. मात्र निवडणुका संपताच दरवाढीने कहर केला आहे. नऊ दिवसांतील सततच्या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोल 115.88 रुपयांवर गेले आहेत, तर डिझेलनेसुद्धा शंभरी ओलांडली आहे. डिझेलचा प्रतिलिटर दर 100.10 पर्यंत गेला आहे. बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे दर 84 पैसे आणि 85 पैशांची वाढ झाली. याचवेळी राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 100.21 रुपयांवरून 101.01 वर तर डिझेलचा भाव प्रतिलिटर 91.47 रुपयांवरून 92.27 रुपयापर्यंत वाढला आहे. 22 मार्चपासून देशभर इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. या दरवाढीचे संसदेत जोरदार पडसाद उमटू लागले आहेत. विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू ठेवला आहे. इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे. इंधन दरवाढीचे सर्वसामान्य जनतेला चटके बसू लागल्यामुळे विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत.
राहुल गांधींचा निशाणा....
इंधन दरवाढीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र्ा सोडले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी ट्विट करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिनक्रमाचा समाचार घेतला. 'पंतप्रधान रोज पेट्रोल-डिझेल-गॅसचे दर वाढवत आहेत. त्यांच्या दिनचर्येत काही कामे ठरलेली असतात. त्यांना पेट्रोल-डिझेल-गॅसचे दर किती वाढवू..? लोकांची 'खर्चे पे चर्चा' कशी थांबवायची? तरुणांना रोजगाराची रिकामी स्वप्ने कशी दाखवायची? आज कोणत्या सरकारी कंपनीची विक्री करावी? शेतकऱयांना अधिक लाचार कसे करावे? या प्रश्नांची चिंता पडलेली असते,' असे ट्विट करीत राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार निशाणा साधला.