व्हीएसआय महासंचालक शिवाजीराव देशमुख यांचे प्रतिपादन
प्रेस मीडिया लाईव्ह :
शिरोळ/प्रतिनिधी-
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने पूरबुडीत क्षेत्रामध्ये शुगर बीटचे उत्पादन उत्तमरित्या घेऊन ऊसाला एक सक्षम पर्याय दिला असून ही राबवलेली प्रायोगिक योजना पूरबाधीत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारी तसेच मार्गदर्शक असल्याचे मत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे या संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी व्यक्त केले.
शुगर बीट प्लॉटच्या पाहणीकरीता आले असता ते बोलत होते. शिरोळ येथील श्री दत्तशेतकरी सह. साखर कारखान्याच्यावतीने कारखान्याच्या ऊस विकास योजनेअंतर्गत कारखाना कार्यक्षेत्रामध्ये प्रायोगिक तत्वावर एकूण ३७ गावामध्ये ५३ शेतकऱ्यांच्या ५० एकर क्षेत्रावरती शुगर बीटची (शुगर बीट वाणसेस पीएसी-६००८) लागवड माहे ऑक्टोबर २०२१ मध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती. शुगर बीट काढण्याचे नियोजन दिनांक ५ मार्च ते ९ मार्च २०२२ या दरम्यान केले आहे. सदर प्लॉटच्या पाहणीकरीता शिवाजीराव देशमुख यांनी भेट देऊन संबंधीत शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्याबरोबरच शिरोळ तालुक्यात कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या अथक प्रयत्नाने सुरु असलेल्या क्षारपड जमीन सुधार योजनेचा आढावा घेत प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणीसुध्दा भेट देऊन कामासाठी शुभेच्छा दिल्या. क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प हा संपूर्ण महाराष्ट्राला एक दिशा देणारा तसेच सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल असे मत व्यक्त केले. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, डॉ. पी. व्ही. घोडके, पी. पी. शिंदे, डॉ. ए. एस. पाटील, सचिन कदम (शास्त्रज्ञ- व्हीएसआय, पुणे) त्याचबरोबर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, माती परिक्षण प्रमुख ए. एस. पाटील, माती परिक्षक रविंद्र हेरवाडे तसेच शेतकरी सदाशिव माळी व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.