प्रेस मीडिया लाईव्ह :
शिरोळ /प्रतिनिधी:
येथील श्री दत्त भांडारच्या वतीने ७ मार्च रोजी महाराष्ट्रातील विविध पिकांच्या पारंपरिक व दुर्मिळ पीक वाणांचे प्रदर्शन आणि चर्चासत्र तसेच ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन दत्त भांडारच्या प्रांगणात केले असल्याची माहिती श्री दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार यांनी दिली.
अधिक माहिती देताना दामोदर सुतार म्हणाले, पारंपरिक पीक वाण संवर्धन ही लोक चळवळ होणे गरजेचे असून त्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी ७ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता विविध पिकांच्या पारंपरिक व दुर्मिळ पीक वाणांचे प्रदर्शन आणि चर्चासत्र होणार आहे. याचे उद्घाटन श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते होणार असून शेती शास्त्रज्ञ डॉ. बी. पी. पाटील हे अध्यक्षस्थानी आहेत. बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक तथा भारतीय कृषी अनुसंधान संस्थेचे सदस्य संजय पाटील यांचे चर्चासत्रामध्ये व्याख्यान होणार आहे. या प्रदर्शनामध्ये ४०० च्यावर पारंपरिक पीक वाणांचे प्रदर्शन ज्यामध्ये १५० जातींची भात, नाचणी, वरी, मका, ज्वारीच्या पन्नासच्या वर जाती, कडधान्य पिके १००, कंद पिके इत्यादींचा समावेश आहे. पारंपरिक पीक वाण वातावरण बदल, अन्न व पोषण सुरक्षाचे महत्त्व या बद्दलचे सविस्तर मार्गदर्शन व्याख्यानांमध्ये होणार आहे. तसेच वैशिष्ट्यपूर्ण पीक वाण आणि त्यांचे मार्केट, कृती कार्यक्रम आखणी व चर्चा यावेळी होईल.
तसेच ८ मार्च रोजी दुपारी ३:३० वाजता आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिला मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे सांगून दामोदर सुतार म्हणाले, हुतात्मा बझार वाळवाच्या कार्यवाह सौ. नंदिनी (काकी) वैभव नायकवडी या मेळाव्याचे उद्घाटक तसेच दत्त साखर कारखान्याच्या जेष्ठ संचालिका श्रीमती विनया घोरपडे या अध्यक्षस्थानी आहेत. प्राचीन भारतीय संस्कृती विद्या केंद्र कोल्हापुरचे संस्थापक नारायण गुरुजी यांचे ध्यान, प्राणायाम व आहार या विषयी व्याख्यान तर एडवोकेट दिलशाद मुजावर यांचे २१ व्या शतकातील नारी शक्ती आणि महिला सबलीकरण या विषयी व्याख्यान होणार आहे.तसेच जीवनविद्या मिशनच्या प्रवचनकार सौ. स्वाती संदीप पाटील यांचेही मार्गदर्शन होणार आहे. या सर्व कार्यक्रमाला सौ. अनिता कोळेकर, सौ. मीनाज जमादार, सौ. संगिता संजय पाटील, सौ. यशोदा कोळी, डॉ. राजश्री पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी जनरल मॅनेजर एस. ए. घोरपडे, सुहास मडिवाळ, बी. बी. पाटील आदी उपस्थित होते.