काँग्रेसने माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीचा आधार घेत देशात 2016 ते 2018 या कालावधीत 19 लाख ईव्हीएम मशीन गायब झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पाच राज्यांच्या निवडणूका पार पडल्यानंतर ईव्हीएम मध्ये फेरफार केल्याचा आरोप सतत करण्यात येत होता. मात्र त्याच पाठोपाठ आता 2016 ते 2018 या कालावधीत देशातील 19 लाख ईव्हीएम मशीन गायब झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे . विविध राज्यांमधील निवडणूकांनंतर ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. त्यातच काँग्रेसने माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीचा आधार घेत देशात 2016 ते 2018 या कालावधीत 19 लाख ईव्हीएम मशीन गायब झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे ईव्हीएम गायब होण्यावरून पुन्हा एकदा राजकीय संघर्ष तीव्र होणार आहे.
कर्नाटक काँग्रेसचे जेष्ठ नेते एच के पाटील यांनी विधानसभेत सांगितले की, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने पुरवठा केलेले 9.6 लाख इव्हीएम आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने 2016 मध्ये पुरवलेले 9.3 लाख ईव्हीएम गायब झाले आहेत, अशी माहिती माहिती अधिकाराच्या हवाल्याने दिली आहे. या प्रकरणावर भारतीय निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलेले नाहीत. मात्र 2014 मध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने 62 हजार 183 ईव्हीएमचा पुरवठा केल्याचा दावा केला आहे. परंतू निवडणूक आयोगाला ते मिळाले नाहीत, असा आरोप एच के पाटील यांनी केला आहे.
या प्रकरणावरून कर्नाटक विधानसभेत काँग्रेसचे एच के पाटील यांनी प्रश्न उपस्थित करत निवडणूक आयोग या प्रकरणावर गप्प का? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच पाटील पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगाने हे आरोप चुकीचे आहेत, असे सिध्द केले तर मी कोणत्याही शिक्षेसाठी तयार आहे. त्यावर कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांनी निवडणूक आयोगाकडून याबाबत माहिती मागवू, असे आश्वासन दिले. मात्र त्यानंतर शशी थरुर यांनी टाईम्स ऑफ इंडियाची बातमी ट्वीट करत म्हणाले की, मी कायम षडयंत्रापासून सावध राहतो. मात्र ईव्हीएमच्या हाताळणीतील अनियमीतता चिंता वाढवत आहे. या प्रकरणावर निवडणूक आयोगाकडून प्रतिक्रीया येण्याची गरज आहे. मात्र गायब झालेल्या ईव्हीएम कुणाकडे आहेत? आणि त्याचा काय वापर केला जातो, असा सवाल शशी थरुर यांनी उपस्थित केला.