प्रेस मीडिया लाईव्ह :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील.
महाड वनविभागाने गुजरात ते चिपळूण सावर्डे जाणाऱ्या एका ट्रकमधून विनापरवाना खैराची वाहतूक करणाऱ्यास महाड वनविभागाचे अधिकारी राकेश साहू यांनी ट्रकचालक - मालकासह ट्रक जप्त केला.
रविवारी साहू यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे मुंबई - गोवा महामार्गावरून विनापरवाना खैराच्या लाकडांची वाहतूक होत आहे. त्यांनी महामार्गावर राजेवाडी फाट्याजवळ कर्मचाऱ्यांसमवेत सापळा रचला. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सिल्वासा ते चिपळूण सावर्डे जाणारा ट्रक तपासला असता त्यामध्ये विनापरवाना असलेल्या खैराच्या लाकडाची वाहतूक होत असल्याचे उघड झाले.
याप्रकरणी ट्रकचालक-मालक शांताराम खंडू पाटील याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कोणतीच कागदपत्रे नव्हती. हा माल सिल्वासामध्ये भरलेला असून, चिपळूण सावर्डे येथे सचिन कात मिल याच्याकडे पोहोचवायचा होता. या ट्रकमध्ये लाखो रुपये किमतीचे ३९५ खैराचे नग सापडले. मालासोबत ५ लाख किमतीचा ट्रकदेखील जप्त केला. पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..