सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होऊ देऊ नका...खासदार बारणे
जनता दरबारात 498नागरिकांच्या लेखी तक्रारी आल्या.
प्रेस मीडिया लाईव्ह
पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख :
पिंपरी चिंचवड मावळचे शिवसेना खासदार संसदरत्न श्रीरंग बारणे यांनी आयोजित केलेल्या जनता दरबाराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. ,चिंचवड येथील अॅटो क्लस्टरमध्ये आज (गुरुवारी) सकाळी 11 ते दुपारी दीड या दरम्यान हा जनता दरबार झाला वीज, पाणी ड्रेनेज , रस्ता लाईन, , अनधिकृत बांधकामे, महावितरणचे धोकादायक पोल, विद्युत वाहिन्यांचे उघडे डबे, अशा विविध विभागाच्या तब्बल 498 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होऊ देऊ नका, त्यांना आपल्या कार्यालयात चकरा मारायला लावू नका, अशा सूचना खासदार बारणे यांनी अधिका-यांना दिल्या आहेत,
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना येणा-या अडचणी सोडविण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकाराने जनता दरबार भरविण्यात आला होता . पिंपरी, चिंचवड, भोसरी या भागातील नागरिक मोठ्या संख्येने जनता दरबारात उपस्थित होते. नागरिकांनी आपली गा-हाणी, समस्या, प्रशासनाकडून कामे करताना होत असलेला विलंब सांगितला. आपली कैफियत मांडली. वीज, पाणीपुरवठा, संथ गतीने सुरु असलेली कामे, ड्रेनेची समस्या, शास्तीकर, अनधिकृत बांधकामे, स्मशानभूमी अशा विविध विभागाशी संबंधित तक्रारी नागरिकांनी दरबारात मांडल्या. खासदार बारणे यांनी सर्व नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. नागरिकाने समस्या सांगताच तत्काळ संबंधित विभागाच्या अधिका-याला खासदार बारणे यांच्याकडून तक्रार मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. तक्रार सांगण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याने आणि ती मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतल्याने नागरिकांनी खासदार बारणे यांचे आभार मानले,
खासदार बारणे म्हणाले, ”लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या मार्गी लावणे माझे काम आहे. नागरिकांच्या विविध विभागाशी संबंधित तक्रारी एकाच छताखाली निकाली निघाव्यात यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले होते. या माध्यमातून जनतेच्या काय समस्या आहेत, हे अधिका-यांना कळले. जनता दरबारात 498 नागरिकांच्या लेखी तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींचे विभागनिहाय वर्गीकरण करुन संबंधित विभागाला पाठविण्यात येतील. ज्या तक्रारी तत्काळ निकाली निघतील. त्याचे प्रशासनाने तातडीने निराकरण करावे. ज्या तक्रारी मार्गी लागू शकत नाहीत. अडचणीच्या आहेत. त्यासाठी संबंधित विभागाच्या अधिका-यांशी बैठक घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. किती तक्रारी निकाली निघाल्या. याचा मी स्वत: 15 दिवसांनी आढावा घेणार आहे. तक्रारदाराला तक्रारीचे निराकरण झाल्याबाबत लेखी पत्राद्वारे कळविले जाईल. निराकरण झाले नसेल. तर, कोणत्या कारणामुळे झाले नाही. तेही तक्रारदाराला लेखी पत्राद्वारे कळविण्यात येईल”.
तसेच त्यावेळी अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, तहसीलदार गीता गायकवाड, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड, महावितरणचे कार्यकारी अभियंता उदय भोसले, उमेश कवडे, अन्नधान्य पुरवठा अधिकारी दिनेश तावरे, मोटार वाहन निरीक्षक वृंदा त्रुरावे, सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकुमार भोसले, रेल्वेचे चीफ कमर्शियल इन्स्पेक्टर संजीव सोन्ना, अभियंता मुकेश कुमार, पीएमआरडीच्या विशाखा चिंतल, पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, वायसीएमचे वैद्यकीय अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे, पालिकेचे कार्यकारी अभियंता संदेश चव्हाण, महापालिकेच्या संबंधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख