पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला अनुकूल वातावरण

तर सत्तेची समिकरणे शिवसेनेच्या हाती असतील.

प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे जिल्हा प्रतिनिधी : अनवरअली शेख :

 पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला अनुकूल वातावरण आहे.  शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक निवडणूक मैदानात उतरणार असून ते जोरदार मुसंडी मारतील तर सत्तेची समिकरणे शिवसेनेच्या हाती असतील, असा ठाम विश्वास शिवसेना उपनेते, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी व्यक्त केला आहे.

 शिवसेना भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने 51 ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान शिवसेना प्रमुखांची प्रतिमा आणि शाल देऊन करण्यात आला. नवनियुक्त युवा सेना पदाधिका-यांचा सन्मान शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्या वेळी रवींद्र मिर्लेकर बोलत होते. शिवसेना महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख वैशाली सुर्यवंशी, जिल्हासंघटक सुलभा उबाळे, जिल्हा उपसंघटक वैशाली मराठे, काशिनाथ पाटील, शहरप्रमुख सचिन भोसले, विधानसभाप्रमुख धनंजय आल्हाट, कामगार सेना नेते इरफान सय्यद, युवा सेनेचे शहर युवा अधिकारी अजिंक्य उबाळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

या वेळी रवींद्र मिर्लेकर म्हणाले की , शिवसैनिकांनी पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विचारांची कास धरावी. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत योग्य जबाबदारी पार पाडावी तसेच शिस्तबद्ध पद्धतीने आपले काम करावे. शिवसेनेची बांधिलकी जनते बरोबर आहे. शिवसेनेच्या हातात सत्ता आली तर विकास कामांचा डोंगर उभा केला जाईल. नगरसेवकांकडून विकासाची कामे करून घेण्याची जबाबदारी माझी असेल. .

शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की , आगामी महानगरपालिका निवडणुकीत 'घर तेथे शिवसेना' अभियान राबवा. घरा घरात शिवसेनेचे विचार पोहोचवा. शिवसेना उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी  एकत्रित प्रयत्न करावेत. नगरसेवक नसताना सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कोरोना काळात आणि पाच वर्ष आपले शिवसैनिक जनतेची सेवा करण्यात सर्वांच्या पुढे होते. त्याचा लाभ निश्चितपणे आपल्याला महानगरपालिका निवडणुकीत होईल , असा विश्वास त्यांनी  या वेळी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post