प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी उर्फ मुन्ना शेख :
पुणे जिल्ह्यासह, शहरातील सातबारा उताऱ्यांच्या हस्तलिखित आणि ऑनलाइन सातबारांत तफावत आढळून आली आहे.
राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी सातबारा संगणकीकरण प्रकल्पांतर्गत हस्तलिखित सातबारा उतारे हे आता डिजिटल स्वाक्षरीयुक्त करण्यात येत आहेत. २०१६-१७ पासून हे काम पुण्यासह राज्यभर सुरू आहे. सध्या सातबारा उतारे ऑनलाइन झाले आहेत. सर्व व्यवहारांत आता ऑनलाइन सातबारा उताराच वापरला जात आहे.
जिल्ह्यात तब्बल १४ लाख ९८ हजार सातबारा उतारे ऑनलाइन करण्यात आले. मात्र, हस्तलिखित सातबारा उतारे ऑनलाइन करत असताना अनेक चुका झाल्या आहेत. यामध्ये सातबारावरील क्षेत्र कमी किंवा जास्त होणे, सातबारावरील नाव कमी होणे किंवा चुकणे यांसारख्या गंभीर चुकांचा समावेश आहे. या चुका दुरुस्त करणे आवश्यक आहे. ही महसूल विभागाची जबाबदारी आहे. मात्र शेतकरी, नागरिकांना सातत्याने तलाठी, मंडल, तहसीलदार कार्यालयांत खेटे घालावे लागतात. या पार्श्वभूमीवर डॉ. देशमुख यांनी खास मोहीम हाती घेतली आहे.
दरम्यान, याकरिता जिल्हाधिकारी स्वत: दररोज सर्व प्रांत, तहसीलदार आणि सर्वाधिक प्रलंबित सातबारा व फेरफार दुरुस्ती असलेल्या तलाठी व मंडलांची ऑनलाइन आढावा बैठक घेणार आहेत. प्रत्येक तालुक्याने दररोज किती फेरफार, सातबारा दुरुस्त करायचे, याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
जिल्ह्यात तलाठी कार्यालयापासून थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नयेत, हाच प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून आता जिल्ह्यात सर्व विसंगत सातबारा, तक्रारी असलेले फेरफार तातडीने दुरुस्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मार्चअखेर हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी.