प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी उर्फ मुन्ना शेख : ( उप संपादक)
पुणे : महानगरपालिकेच्या अतिक्रमण, बांधकाम निर्मूलन आणि आकाशचिन्ह विभागाकडून शहरात जोरदार अतिक्रमण कारवाईचा धडाका सुरू आहे. सदरच्या कारवाईत केवळ छोट्या व्यावसायिकांनी दुकानासमोर फ्रंटमार्जिंनमध्ये केलेल्या बांधकामांवर तसेच दुकानाच्या समोर लावलेल्या डिजिटल साईन बोर्डावर कारवाई केली जात आहे.मोठ्या हॉटेल मध्ये फ्रंटमार्जिंन तसेच साईट मार्जिंन मधील कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ होत आहे. त्या मुळे, अतिक्रमण कारवाईत दुजाभाव सुरू असल्याचे बोलले जात आहे.
महानगरपालिकेवर 15 मार्च रोजी प्रशासक नियुक्त होताच, शहरातील रस्ते तसेच पदपथ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी संयुक्त कारवाई हाती घेतली आहे. त्यानंतर तीन विभाग मिळून एकत्र कारवाई सुरू आहे. यात गेल्या आठ दिवसांत दुकानांसमोरील रिकाम्या जागेत असलेल्या बांधकामांवर कारवाई केली जात आहे. त्यात, समोर उभारलेले शेड, डिजिटल डिस्प्ले जेसीबीने तोडले जात आहेत. मात्र, त्याचवेळी प्रमुख रस्त्यांवर असलेल्या मोठ्या हॉटेलने केलेल्या अतिक्रमण कारवाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यात, सिंहगड रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, फर्गसन रस्ता, कर्वे रस्ता, डीपी रस्ता, टिळक रस्ता, नगररस्ता, तसेच उपनगरांमधील प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे. ही हॉटेल प्रमुख चौकांच्या आसपास असल्याने कारवाईचे नियोजन करताना सुरुवात केल्यानंतर कारवाईचा शेवट अशा हॉटेलच्या आधीच होईल, असे नियोजन केले जात आहे.
सिंहगड रस्ता तसेच कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी म्हात्रे पूल ते राजाराम-पूल हा डीपी रस्ता विकसीत करत त्याचे रूंदीकरण केले. या रस्त्यावर प्रामुख्याने हॉटेल व मोठी मंगल कार्यालये असून या हॉटेलसमोरील रस्त्यांच्या दोन लेन या हॉटेलमध्ये वाहनांच्या पार्किंगमुळे अडून पडत आहेत. तर, या ठिकाणी केवळ आपल्या हॉटेलमध्येच आलेल्या ग्राहकाला पार्किंग करून दिली जात असून इतरांनी वाहने लावल्यास त्यांना धमकावण्यात येत आहे. शहरात वाहतूक कोंडीच्या नावाखाली वाहतूक पोलिसांना सोसायट्यांच्या आतमधील परिसरात सम-विषम तारखेचे पार्किंगचे नियोजन केले आहे. मात्र, या रस्त्यावर अस्ताव्यस्त पार्किंग होत असताना तसेच बेकायदेशीर रस्ता पार्किंगसाठी अडविला जात आहे.