मास्कची सक्ती, प्रवासासाठी लसीच्या दोन डोसच्या प्रमाणपत्राची सक्ती हे सर्व निर्बंध हटवण्यात आले ..
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई : कोरोनाचे कडक निर्बंध आणि मास्क मुळे गुदमरलेली राज्यातील वैतागलेली जनता गुढीपाडव्या पासून मास्क मुक्त व कोरोनाच्या निर्बंधांपासून संपूर्णपणे मुक्त होणार आहे. यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.सण-उत्सव, यात्रांवरील सर्व निर्बंध उठवण्यात आल्यामुळे महाराष्ट्रात गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या हिंदू नववर्षाचे स्वागत आता एकदम दणक्यात व दिमाखात होईल. तब्बल 736 दिवसांच्या निर्बंधा नंतर राज्यातील जनता मोकळा श्वास घेणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, मागील दोन वर्षांपासून राज्यात कोरोनाचे निर्बंध लागू होते. पण आता 2 एप्रिल रोजी साजरा होणाऱया गुढीपाडव्यापासून साथरोग नियंत्रण कायदा व आपत्कालीन व्यवस्थापन कायदा मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या दोन कायद्यांच्या माध्यमातून राज्यात अनेक निर्बंध लादण्यात आले होते. पण हे दोन्ही कायदे मागे घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे हॉटेलमधील पन्नास टक्क्यांची मर्यादा, बस प्रवासातील प्रवाशांची संख्या, मास्कची सक्ती, प्रवासासाठी लसीच्या दोन डोसच्या प्रमाणपत्राची सक्ती हे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. पण तरीही राज्यातील जनतेने एकदम बिनधास्तपणे वागू नये. लोकांनी काळजी घेतलीच पाहिजे. आता मास्क अनिवार्य नाही, पण ऐच्छिक जरूर आहे.
या निर्णयामुळे गुढीपाडवा, मुंबईतल्या शोभायात्रा उत्साहाने साजऱया करता येतील. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पूर्ण उत्साहाने साजरी करता येईल. अन्य इतर सण पूर्ण उत्साहाने साजरे करता येतील, असेही ते म्हणाले.
या बाबत सर्वांशी चर्चा करूनच निर्णय
अमेरिका, चीन, युरोपमधील काही देशांनी मास्कमुक्ती केली आहे, पण आपण राज्यात मास्क ऐच्छिक ठेवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्रिमंडळातील सदस्यांनी कोरोना टास्क फोर्स, वैद्यकीय तज्ञ, आरोग्य विभाग, केंद्र सरकारशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. आजच्या घडीला राज्यात 700 ते 800 कोरोनाच्या केसेस सापडतात. रोज 50 ते 60 हजार चाचण्या केल्या जातात. या चाचण्यानंतर पॉझिटिव्हिटी रेट .4 च्याही खाली आला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. लग्न सोहळे समारंभ, सभांच्या उपस्थितीवर बंधन नाही, पण लोकांनी आपली स्वतःची व लोकांची काळजी घेण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी व महत्त्वाच्या ठिकाणी मास्क वापरावा, पण हा निर्णय ऐच्छिक असेल.
- राजेश टोपे, सार्वजनिक आरोग्यमंत्र
- 2 एप्रिलपासून महाराष्ट्र मास्कमुक्त
- सावधगिरीसाठी मास्क ऐच्छिक
- लोकल प्रवासासाठी लसीच्या प्रमाणपत्राची गरज नाही
- सर्वधर्मीयांचे उत्सव निर्बंधमुक्त
- यात्रा, जत्रा धडाक्यात साजरा होणार
- मॉल, सार्वजनिक ठिकाणे, मैदानात मास्कची गरज नाही
कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे.
अनवर अली शेख : सह संपादक :