प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या कुर्ला, वांद्रे आणि सांताक्रूझ मधील विविध मालमत्तांच्या तपशीला संदर्भात कागदपत्रे मागवली आहेत.ईडीचे सहाय्यक संचालक नीरज कुमार यांनी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट, 2002 च्या कलमां खाली नवाब मलिक यांच्या विरुद्ध सुरू असलेल्या तपासासाठी ही माहिती मागवली आहे.
नीरज कुमार यांनी 24 मार्च रोजी मलिक यांना पत्र लिहून त्यांच्याकडे याशी संबधित कागदपत्रे मागितले होते. यामध्ये ज्या मालमत्तेची माहिती मागवली आहे ती नवाब मलिक, त्यांची पत्नी मेहजबीन आणि त्यांचा मुलगा फराज यांच्या नावावर आहे. ईडीने सांताक्रूझ पश्चिम येथील फ्लॅट क्रमांक 6, गुलामनबी मनील आणि फ्लॅट क्रमांक 501, वांद्रे वास्तू आणि वांद्रे पश्चिम संदर्भात तपशील मागवला आहे. जे कथितपणे मलिक यांचा मुलगा फराज यांच्या मालकीची आहेत.
ईडीने कुर्ला पश्चिम येथील नूर मंझिल येथील फ्लॅट क्रमांक बी-03, सी-2, सी-12 आणि जी-8 ची माहितीही मागितली होती, जी कथितपणे मलिक यांची पत्नी मेहजबीन यांच्या नावावर आहे. दरम्यान, ईडीने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे 300 कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी नवाब मलिक यांचा संबंध असल्याचं ईडीला तपासात आढळलंय. त्यानुसार ईडीने कारवाई करत नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.