प्रेस मीडिया लाईव्ह :
येणारे चार ते पाच दिवस राज्यात उष्णतेचा लाटेचा धोका हवामान खात्याने वर्तवला आहे.याबाबत हवामान खात्याने सांगितले की, सूर्याचा युवी इंडेक्स धोक्याच्या पातळीवर पोहोचल्यामुळे सूर्याकडून अतिनील किरणांची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे मार्चमध्ये सलग दुसऱ्यांदा उष्णतेची लाट घोंगावत आहे. जर आपण आधी 17 ते 19 मार्च या कालावधीचा विचार केला तर कोकण आणि विदर्भामध्ये ही लाट आली होती.
आता 31 मार्चपर्यंत ही लाट असणार आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणाचा पारा हा 43 अंश याच्यापुढे गेला असून पुढची चार ते पाच दिवस दुपारच्या वेळी अतिनील किरणांची तीव्रता अधिक असल्याने दुपारच्या वेळी उन्हात जाणे टाळावे असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे कारण हे अतिनील किरणे आरोग्यासाठी आणि त्वचासाठी खूपच घातक असतात.
जर सोमवारचा विचार केला तर राज्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला येथे झाली. चंद्रपूर मध्ये देखील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली असून तापमानाचा पारा 42 अंश याच्यापुढे आहे. वायव्येकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पश्चिम विदर्भामध्ये मागील काही दिवसात सगळ्यात जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राजस्थान मधुन जे वारे वाहत आहेत त्यामुळे पश्चिम विदर्भात तापमानात मोठे बदल होत असून अनेक जिल्ह्यात उष्माघाताची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
29 मार्च म्हणजे आजचा विचार केला तर अमरावती, अकोला आणि बुलढाणा मध्ये उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. त्यासोबतच 31 मार्च खानदेशी साठी उष्ण असणार आहे.या मध्ये खानदेशातील जळगाव, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोलीत उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला असून संपूर्ण पश्चिम विदर्भात तापमान सरासरीच्या साडेचार ते साडेसहा अंश सेल्सिअस वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 31 मार्च रोजी देखील उष्णता जैसी थे राहुन परिस्थिती कायम राहणार आहे.