प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, या साठी मुबंई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती यांची 9 मार्च पूर्वी सकारात्मक चर्चा करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्याचा निर्णय मुंबई येथे झालेल्या सहा जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला.जो पर्यंत खंडपीठाबाबत निर्णय होत नाही, तो पर्यंत लढा थांबणार नसल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमधील सभागृहात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील आमदार, खासदार, मंत्री यांच्यासह स्थनिक बार असोसिएशनचे पदाधिकारी, ज्येष्ठ विधिज्ञ व वकिलांची बैठक पालकमंत्री सतेज पाटील यांनी आयोजित केली होती.
कोल्हापुरात खंडपीठ स्थापनेला विरोध नसल्याचे स्पष्ट करत कोल्हापुरात खंडपीठाची स्थापना केल्यास मुंबईचे महत्त्व कमी होते यात काही तथ्य नाही. वेगाने न्याय मिळावा, त्यासाठी न्याय व्यवस्थेचे विकेंद्रीकरण आवश्यक आहे. खंडपीठासाठी आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मुख्य न्यायमूर्मींबरोबर 9 मार्चपूर्वी सकारात्मक चर्चा व्हावी, यासाठी पुढाकार घेऊ. शेवटी सर्किट बेंच तर घेऊच, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे निबाळकर यांनी सांगितले.
कोल्हापूर खंडपीठासाठी सर्वजण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन कोल्हापूर येथेच खंडपीठ व्हावे, असे एकमत असल्याची मागणी न्यायमूर्तींपर्यंत पोहोचवावी, अशी विनंती करू, असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले, तर कोल्हापूर खंडपीठ व्हावे, यासाठी कोणाचेही दुमत नाही. मात्र, मुंबईमधील विरोध करणाऱ्या काही शुक्राचार्यांना रोखावे लागेल, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.