तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल....प्राचार्य डॉ. टी.एस.पाटील
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.१७ सतत सात दशके शेतकरी कष्टकरी जनतेच्या न्याय हक्कांसाठी लढणारे तसेच लोक प्रबोधनासाठी उभे आयुष्य खर्च करणारे प्रा.एन.डी. पाटील हे महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच्या इतिहासातील एक अतिशय प्रगल्भ लढवय्ये व्यक्तिमत्त्व होते.
आपल्यावरील अन्यायाला दाद मिळावी यासाठी लढणारा एन.डी.नावाचा बुलंद योद्धा आपल्यामागे आहे असे सर्वसामान्य माणसांना व संस्था - संघटनांना वाटणे यातच त्यांची महानता लपलेली होती. सत्याची कास आणि नैतिक व वैचारिक अधिष्ठानाच्या आधारे त्यांनी आयुष्यभर केलेले काम व जपलेली विचारधारा घेऊन आपल्याला पुढे जावे लागेल. तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत प्राचार्य डॉ. टी.एस.पाटील यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालय यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या दुसऱ्या मासिक स्मृतिदिनाच्या निमित्ताने "प्रा.एन.डी. पाटील :व्यक्ती आणि विचार" या विषयावर त्यांनी मांडणी केली. स्वागत व प्रास्ताविक प्रसाद कुलकर्णी यांनी केले.
प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील म्हणाले, एन.डी.नी कर्मवीर अण्णांचे शैक्षणिक विचार आणि वर्ग व वर्ण लढाई एकत्रित केली पाहिजे हा शेकापचा विचार अग्रक्रमाने जपला.तसेच कार्ल मार्क्स पासून गांधींपर्यंत आणि छत्रपती शिवराय, महात्मा फुले,राजर्षी शाहू , घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर , कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे आदींचे विचार आपल्या आंदोलनातून व प्रबोधनातून ते पेरत राहिले. महाराष्ट्राच्या प्रबोधन चळवळीचे अग्रणी म्हणून आणि पिचलेल्या वर्गाचे तारणहार म्हणून ते अखेरपर्यंत कार्यरत होते. त्यांनी विविध चळवळी, संस्थांना नेतृत्व दिले. पंचेचाळीस वर्षापूर्वी समाजवादी प्रबोधिनीच्या स्थापनेमधील ते महत्त्वाचे घटक होते.अखेरपर्यंत प्रबोधिनीच्या कामात सक्रिय सहभागी होते.
प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील पुढे म्हणाले ,महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात एन.डी.पाटील म्हणजे नैतिक धाक आणि अंकुश होते.सर्वांगीण समतेसाठी आयुष्य व्यतीत करणारा महान कृतिशील प्रज्ञावंत असे ते व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे जीवन आणि कार्य आपण समजून घेऊन ते अंगीकृत केले पाहिजे. प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून एन. डी.पाटील यांची बालपणापासूनची वाटचाल विषद केली.शेकापक्ष आणि रयतसह सर्व संस्थात दिलेले योगदान, टोलपासून सेझपर्यंत लढवलेली आंदोलने,
विधानसभा-विधानपरिषदेतील व हजारो सभेतील भाषणे आणि त्यांनी केलेले लेखनआदी सर्व बाबींचा सविस्तर उहापोह केला. या व्याख्यानास जिज्ञासू मंडळी चांगल्या संख्येने उपस्थित होती. प्रा. रमेश लवटे यांनी आभार मानले.