प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी शहर परिसरात वादळी पावसाने अनेक ठिकाणचे विद्युत खांब कोसळून वीज पुरवठा खंडीत झाला आहे.परिणामी विद्युत पुरवठ्याअभावी शेतीसाठी पाणी पुरवठा होत नसल्याने पिकांचे नुकसान होवून पिके उद्ध्वस्त होण्याची भिती निर्माण झाली आहे.त्यामुळे महावितरण कंपनीने
विद्युत खांबांची दुरुस्ती करुन वीज पुरवठा सुरळीत करावा ,अशा मागणीचे निवेदन आज बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहुल राठी यांना सादर करण्यात आले.तसेच याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
इचलकरंजी शहर परिसरात काही दिवसांपूर्वी वादळी पावसाने थैमान घातले होते.यामध्ये परिसरातील विद्युत खांब ,झाडे कोसळली होती.तसेच अनेक ठिकाणी घरांसह मालमत्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.ब-याच ठिकाणी विद्युत खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.परिणामी , विद्युत पुरवठ्याअभावी शेतीसाठी पाणी पुरवठा होत नसल्याने पिकांचे नुकसान होवून पिके उद्ध्वस्त होण्याची भिती निर्माण झाली आहे.
त्यात सदर विद्युत खांब दुरुस्तीचे काम करण्याकडे महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.वादळी पावसाने
विद्युत खांब कोलमडून वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटनेला आता तब्बल १५ दिवस उलटत आले तरी देखील काही ठिकाणचा शेतीपूरक वीज पुरवठा खंडीत करण्यात आल्याने पाण्याअभावी शेतातील पिके करपून शेतकरी अडचणीत आला आहे.
परिणामी ऐन उन्हाळ्यात शेती पिकाला पाणी पुरवठा नसल्याने हातातोंडाशी आलेले पीक नष्ट होण्याची भीती निर्माण होवून शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. याच पार्शवभूमीवर आज बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी इचलकरंजी येथील महावितरण कार्यालयात अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहुल राठी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्यांचे गा-हाणे मांडण्यात आले.तसेच त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावर अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहूल राठी यांनी विविध ठिकाणचे विद्युत खांब बसवून शेतीपूरक वीज पुरवठा सुरु करु ,असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले.यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी येत्या दोन ते तीन दिवसात शेतातील पिकांसाठी आवश्यक असणा-या ठिकाणचा वीज पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
यावेळी शिष्टमंडळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बसगोंडा बिरादार, सतीश मगदूम, , गोवर्धन दबडे, हेमंत वणकुंद्रे, विश्वास बालीघाटे, अभिषेक पाटील ,महावीर बेडक्याळे, बाळासो पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.