काँग्रेसने आखला भाजपची कोंडी करण्याचा प्लॅन ..
प्रेस मीडिया लाईव्ह :
गोवा : गोव्यातील निवडणुकांमध्ये एकहाती सत्ता मिळवल्यानंतर भाजपातून मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं. अखेर मोदींनी प्रमोद सावंत यांना पुन्हा संधी दिली. पक्ष नेतृत्वाच्या विश्वासानंतर सावंत २८ मार्चला शपथविधी पार पडणार आहे.यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतून दाखल होणार आहेत. मात्र त्याआधीच काँग्रेसने भाजपची कोंडी करण्याचा प्लॅन आखला आहे. प्रमोद सावंत पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याआधीच राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
मायकल लोबो आधीच्या भाजप सरकारमध्ये मंत्री होते. गोव्यात निवडणुका लागण्याआदी त्यांनी काँग्रेसची वाट धरली. यंदा ते कलंगुटमधून विजयी झाले आहेत. पण काँग्रेसच्या नशीबी पराभव आल्याने लोबो आता विरोधी बाकांवर असणार आहेत. इंधन दरवाढीवरून जनतेला त्रास सहन करावा लागत असल्याने लोबोंनी भाजप सरकारवर टीका केली. महागाईची जाणीव मोदींना करून देण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.निवडणुकांनंतर देशात महागाई वाढत आहे. सर्वसामान्य गोष्टींपासून इंधन आणि आता औषधांच्या किमती देखील वाढल्या आहेत. मागील सहा दिवसांत पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर ५ रुपयांची वाढ झालीय. तर एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागला आहे. पाच राज्यांच्या निवडणुका असल्याने सरकारने कोणताही ज्यादाचा भार सर्वसामान्यांवर टाकला नव्हता. मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. सीएनजी आणि स्वयंपाकाच्या पाईप्ड नॅचरल गॅसचे दर देखील वधारले आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेची होरपळ सुरू आहे. हाच मुद्दा पकडत शपथविधीवेळी काँग्रेस भाजपची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहे. काँग्रेसचे आमदार मायकेल लोबो यांनी जनतेला आवाहन केलंय शपथविधीला उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी मोदी आल्यानंतर त्यांना देशातील महागाईचा जाब विचारावा, असं लोबोंनी म्हटलं. यानंतर आता शपथविधीच्या कार्यक्रमात इंधन दरवाढीवरून गोंधळ होण्याची शक्यता बळावली आहे.