सोमय्या आणि निलेश राणे यांना ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता .
कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन केल्यास कारवाई तर होणारच .......गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई.
प्रेस मीडिया लाईव्ह
दापोली : शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचं रिसॉर्ट पाडण्याच्या मागणीसाठी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या दापोलीत दाखल झाले आहेत. यावेळी किरीट सोमय्या आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं.
यावेळी मोठ्या संख्येनं भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, दापोली पोलिसांकडून जमावबंदी आदेश लागू करण्यात आले होते. तसंच दापोलीत प्रवेश करताना सोमय्या यांना पोलिसांकडून नोटीसही देण्यात आली होती. मात्र, किरीट सोमय्या मोठं शक्तिप्रदर्शन करत दापोली पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. आता दापोली पोलिसांकडून सोमय्या यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. इतकंच नाही तर कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन केल्यास कारवाई तर होणारच, असा इशारा गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिलाय.
दरम्यान, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांना फोनवरुन विचारलं असता, पोलिसांनी नोटीस देऊनही त्याचं उल्लंघन केलं जात असेल, कायदा आणि सुव्यवस्थेतचा प्रश्न उपस्थित होत असेल तर पोलीस त्यांची कारवाई करतील, असा इशारा दिलाय. त्यामुळे सोमय्या आणि निलेश राणे यांना ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
किरीट सोमय्या हे अनिल परब यांच्या कथित रिसॉर्टकडे जाण्यावर ठाम आहेत. अशावेळी पोलिसांकडून त्यांना रिसॉर्टवर जाण्यास मनाई करण्यात येतेय. दापोली पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर किरीट सोमय्या आणि निलेश राणे यांना पोलिसांनी बसवून घेतलं आहे. त्या दोघांचेही जबाब नोंदवण्याचं काम सुरु असल्याची माहिती मिळतेय. निलेश राणे यांचे वकीलही पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून किरीट सोमय्या आणि निलेश राणे यांना ताब्यात घेतलं जात असल्याचं कळतंय.