वक्फ बोर्ड म्हणजे अधिकारी, नेत्यांसाठी मलिदा खाण्याचे ठिकाण होऊन बसले आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
अनवरअली शेख : ( सह संपादक )
बीड : सध्या बीड जिल्हा वक्फ बोर्डच्या मालमत्तेच्या बेकायदेशीर हस्तांतर प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत आला आहे.राज्यात वक्फच्या मालमत्ता गैरव्यवहार प्रकरणी १६ गुन्हे नोंद झाले असून, त्या पैकी सात गुन्हे बीड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. अधिकारी व नेत्यांनी संगनमत करून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खिशात घातल्याचे उघड झाले आहे. वक्फ बोर्ड म्हणजे अधिकारी, नेत्यांसाठी मलिदा खाण्याचे ठिकाण होऊन बसले आहे.
वक्फ बोर्डच्या जमिनीच्या गैरव्यवहारा संदर्भात अनेक तक्रारी होत्या. मालमत्ता खालसा करून त्या नियमबाह्यपणे भूमाफियांच्या घशात घालण्यात आल्या. वक्फ बोर्डचे नाव सातबारा उताऱ्यावरून कमी करून त्या जागी खासगी लोकांची नावे सर्रासपणे लावण्यात आली आहेत. दरम्यान, वक्फ बोर्डने मालमत्ता गैरव्यवहाराविरुद्ध फौजदारी कारवाया सुरू केल्या आहेत. आष्टी पोलीस ठाणे दोन, अंभोरा, शिवाजीनगर, बीड शहर, बीड ग्रामीण, दिंद्रूड येथे प्रत्येकी एक गुन्हा नोंद आहे. आष्टीतील दोन, अंभोरा ठाण्यातील एक अशा तीन गुन्ह्यांच्या तपासासाठी अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या अध्यक्षते खाली विशेष तपास पथक स्थापन केलेली आहे.
आष्टीतील एका गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून, उर्वरित दोन गुन्ह्यांचा तपास प्रशिक्षणार्थी आयपीएस पंकज कुमावत हे करत आहेत. दरम्यान, बीड ग्रामीण व शिवाजीनगर ठाण्यात दाखल असलेल्या दोन प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केलेला आहे. दरम्यान, तत्कालीन उपजिल्हाधिकारी डॉ.एन.आर.शेळके, प्रकाश आघाव यांच्या सह मंडळाधिकारी, तलाठी व काही ठिकाणी राजकीय पक्षांचे नेते आरोपी आहेत. डॉ. एन.आर. शेळकेला पोलिसांनी जेरबंद केले तर प्रकाश आघाव अजून फरार आहे.
वक्फ बोर्ड व देवस्थान जमिनी संदर्भात दाखल गुन्हे व चौकशा यावर एसआयटी (विशेष तपास पथक) नियंत्रण ठेवून आहे. पोलीस महासंचालक कार्यालय, विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडून नियमित आढावा सुरू आहे. विशेष म्हणजे विधिमंडळ अधिवेशनातही वक्फच्या गैरव्यवहाराचा मुद्दा गाजला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही बीडमधील वक्फ घोटाळ्याच्या संदर्भात दोनवेळा बैठका घेऊन तपासाची स्थिती जाणून घेतली आहे.