भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची वेळ ..इम्तियाज जलील
प्रेस मीडिया लाईव्ह :
औरंगाबाद मध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यात एक बैठक झाली असल्याचं वृत्त समोर आलं आहे.या बैठकीत इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत येण्याची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची वेळ आली असल्याचंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. इम्तियाज जलिल यांनी म्हटलं, हे खरं आहे की ते भेटायला आले होते. माझ्या आईच्या निधनानंतर सांत्वनासाठी ते आले होते.
कुणालाही आम्ही नकोयत. फक्त मुस्लिमांची मते पाहिजेत. काँग्रेस, राष्ट्रवादीलाही मुस्लिम मते हवी आहेत ना या मग आमच्यासोबत. एका मुलाखतीत इम्तियाज जलिल यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
या देशात सर्वात जास्त नुकसान जर कोण करत असेल तर ते भाजप आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी जे काही करावं लागेल त्यासाठी आम्ही तयार आहोत. उत्तरप्रदेशात सुद्धा समाजवादी पार्टी आणि बसपा सोबत बोलणं केलं होतं. पण त्यांना मतं हवी आहेत आणि ओवैसी साहेब नकोयत, एमआयएम पक्ष नकोय. म्हणून मी त्यांना ऑफर दिली की, चला आपण दोघेही एकत्र येऊन निवडणूक लढवूया असंही इम्तियाज जलिल म्हणाले. मी त्यांना ऑफर दिली आहे. माझ्या ऑफरनंतर ते शांत बसले. आता त्यांचे वरिष्ठ नेते त्याबाबत काय बोलतात ते समोर आल्यावर बसू आणि विचार करु. नाहीतर आमची एकला चलो रे ची तयारी आहेच. त्यांनी कमीत कमी शरद पवारांना सांगावे की एमआयएम महाविकास आघाडी सोबत एकत्र येण्यास तयार आहे असंही इम्तियाज जलिल यांनी म्हटलं. भाजपला हरवण्यासाठी एकत्र यायला हवं, राष्ट्रवादी काँग्रेसने ही बाब गांभीर्याने घ्यावी असं वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केलं आहे.
Tags
औरंगाबाद