साई सहारा इन्फ्राण्ड फसिलिटी प्रा. लि. या कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल ..
या बाबत आता अण्णा हजारे काय भूमिका घेतात..? या कडे सर्वांचे लक्ष
प्रेस मीडिया लाईव्ह :
अहमदनगर : संपूर्ण देशात भ्रष्टाचाराच्या विरोधात जनजागृती निर्माण करणाऱ्या अण्णा हजारे यांच्या माजी स्वीय सहायकाच्या कंपनीने गैरव्यवहार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. टँकरने पाणी पुरवठा करताना गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवून पारनेर तालुक्यातील साई सहारा इन्फ्राण्ड फसिलिटी प्रा. लि. या कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कंपनी हजारे यांचे एकेकाळचे स्वीय सहायक व सध्याचे कार्यकर्ते उद्योजक सुरेश पठारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची आहे. गैरव्यवहार उघडकीस आणणारे रामदास घावटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट अण्णा हजारे यांची भेट घेतली. या कंपनीशी संबंधित काही संचालक राळेगणसिद्धी येथील विविध संस्थांचे पदाधिकारी आहेत, त्यांचे राजीनामे घेण्यात यावेत अशी मागणी घावटे यांनी केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात 2019 मध्ये दुष्काळामुळे पाणी टंचाई होती. त्यामुळे प्रशासनाने टँकरने पाणी पुरवठा केला. या कालावधीत पाणी पुरवठा करणाऱ्या टॅंकरच्या खेपा बोगस दाखवून मोठा गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. त्याची चौकशी झाली. तथ्य आढळून आल्याने कार्यकारी अभियंता आनंद रुपनर यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिस ठाण्यात साई सहारा इन्फ्राण्ड फसिलिटी प्रा. लि. यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ही कंपनी राळेगणसिद्धी येथील पठारे, निघोज येथील मळगंगा डेअरी उद्योग समुहाचे मच्छिंद्र लंके, अभय औटी, दादाभाऊ पठारे, नितीन अडसुळ, विठ्ठल गाजरे, विठ्ठल पवार यांच्या मालकीची आहे.
पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय टंचाई विभाग यांनी पारनेर येथील साई सहारा या कंपनीला टँकरने पाणी पुरवठा करण्याचे गेली पाच वर्षे कंत्राट दिले होते. या कंपनीने पाणी पुरवठा करताना अनेक शासन नियमांचा भंग करून कोट्यवधी रुपयांचा निधी हडप करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पारनेर तालुक्यातील लोकजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामदास घावटे यांनी यासंबंधी तक्रार दिली होती. या तक्रारीचा त्यांनी दीर्घकाळ पाठपुरावा केला. त्यानंतर आता हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना तातडीने अटक करावी. त्यांच्याकडून पुरावे नष्ट केले जाण्याची शक्यता आहे, अशी मागणी आता घावटे यांनी केली आहे या बाबत आता अण्णा हजारे काय भूमिका घेतात..? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.