प्रेस मीडिया ऑनलाइन :
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस :
पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा कार्यभार अजित गव्हाणे यांनी खराळवाडीतील पक्ष कार्यालयात स्वीकारला. मावळते शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी गव्हाणे यांना शहराध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसविले.
तरुण, अभ्यासू, शांत, संयमी, सर्वसमावेशक अशा गव्हाणे यांची शहराध्यक्षपदी निवड झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह, आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी उसळली होती.
शहराध्यक्ष गव्हाणे यांच्यासोबत समन्वयक व मुख्य प्रवक्ता योगेश बहल, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख यांनीही पदभार स्वीकारला. पार्टी कार्यालयाच्यावतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला. सर्वांनी शहराध्यक्ष गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली एकजुटीने काम करण्याचा निश्चय केला.
शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, 'शरद पवार साहेब, अजितदादा, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, पार्थ पवार यांनी माझ्यावर मोठा विश्वास टाकला आहे. नगरसेवक म्हणून महापालिकेत काम करत असताना पक्षाने माझ्यावर शहराची जबाबदारी दिली. महापालिकेतील भाजपची भ्रष्ट सत्ता उलथवून टाकण्यासाठी चोवीस तास काम करणार, रात्रीचा दिवस करून संघटन बळकट करणार आहे. सर्व आजी-माजी नगरसेवक, माजी पदाधिकारी, सर्व सेलचे पदाधिकारी यांना सोबत घेऊन महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविणार आहे'.
संजोग वाघेरे म्हणाले, 'अजितदादांवर निष्ठा असलेला, दादांना आवडणार, महापालिकेत वचक असलेला, उद्योग, व्यवसायात शहराध्यक्ष गव्हाणे आघाडीवर आहेत. त्यांच्यासोबत 100 टक्के राहू, त्यांना मनापासून साथ देऊ, आगामी निवडणुकीत 100 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याचे शहराध्यक्ष यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करणार आहोत'
योगेश बहल म्हणाले, 'अजितदादांनी आम्हा सर्वांवर मोठा विश्वास टाकला आहे. तो सार्थ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही सर्व वरिष्ठ नेते मंडळी एकजुटीने अजित गव्हाणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही'.
सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला पक्षाकडून संधी!
युवक अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले, 'मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील आहे. मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमीवर नाही. मागील पाच वर्षे माझे पक्ष संघटनेतील काम पाहून अजितदादा, शहरातील पक्ष नेतृत्वाने मला संधी दिली. या संधीचे मी नक्कीच सोने करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजातील सर्व घटकाला सामावून घेत काम करण्याची संधी देतो. पिंपरी- चिंचवड शहरात युवक संघटन बळकट करणार आहे. जास्तीत-जास्त युवक पक्षाशी जोडणार आहे. अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाचे 100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार आहे'.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक साकोरे यांनी केले. तर, नगरसेवक पंकज भालेकर यांनी आभार मानले.