प्रेस मीडिया ऑनलाइन :
अनवरअली शेख :
पुणे -विनापरवाना धावत असणाऱ्या बाईक टॅक्सी, ऑनलाइन मुक्त परवाना, कल्याणकारी मंडळ आदी प्रलंबित बाबींसाठी शहरातील रिक्षा संघटना एकत्र आल्या आहेत . रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांसाठी रिक्षाचालक-मालकांच्या वतीने 14 फेब्रुवारी रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.रिक्षा चालक-मालक कृती समितीच्या वतीने मंगळवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. यामध्ये आम आदमी रिक्षा संघटना, शिवनेरी रिक्षा संघटना, पुणे शहर जिल्हा वाहतूक सेवा संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, महाराष्ट्र रिक्षा पंचायत आदी संघटना सहभागी होणार आहेत.
शहरात धावणाऱ्या रॅपिडो बाईक टॅक्सीवर कारवाई व्हावी, रिक्षाचालकांच्या कल्याणकारी महामंडळाची स्थापना करावी, रिक्षाचे ऑनलाइन मुक्त परवाने बंद करावे, आरटीओमध्ये पासिंगदरम्यान होणाऱ्या दलालांच्या हस्तक्षेपाची दखल घ्यावी, फायनान्स कंपन्यांकडून बेकायदेशीरपणे होणाऱ्या कर्जवसुलीबाबत कारवाई व्हावी, आदी प्रमुख मागण्या असल्याचे आबा बाबर यांनी सांगितले.