पूरबुडीत क्षेत्रामध्ये शर्कराकंद (शुगर बीट)चे उत्पादन घेऊन श्री दत्तने उसाला सक्षम पर्याय दिला

 म. फुले कृषी महाविद्यापीठ राहुरीचे माजी कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकर यांचे प्रतिपादन

प्रेस मीडिया ऑनलाइन :

शिरोळ /प्रतिनिधी:

पूर बुडीत क्षेत्रामध्ये शर्कराकंद (शुगर बीट)चे उत्पादन उत्तमरित्या घेऊन श्री दत्त साखर कारखान्याने उसाला एक सक्षम पर्याय दिला आहे. त्याही पुढे जाऊन देश-विदेशात पूरबुडीत क्षेत्रांमध्ये घेतल्या जाणाऱ्या फळांचे उत्पादन घेण्याचा पुढील टप्पा गाठण्याचे नियोजन दत्त कारखान्याने करावे, असा सल्ला म. फुले कृषी महाविद्यापीठ राहुरीचे माजी कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकर यांनी केले.







  शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठांचा अपुरा पुरवठा, वाढत्या किंमती व शाश्वत ऊस उत्पादन घेण्यासाठीच्या  कार्यक्रमांतर्गत शास्त्रज्ञ, शेती तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांचे चर्चासत्र कारखाना कार्यस्थळावरील पॉलीटेक्निक कॉलेज मध्ये आयोजित केले होते. यामध्ये डॉ. योगेंद्र नेरकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

डॉ. योगेंद्र नेरकर पुढे म्हणाले, महापूरामध्ये तग धरून राहिलेल्या उसापासून नवी रोपे तयार करणे, बुडीत क्षेत्रामध्ये लिची, शुगर बीट घेणे, भात पीक घेणे आदी पर्यायावर पूर्वी चर्चा झाली होती. त्यावर गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने शुगरबीटचे उत्पादन घेऊन गाळप करत आहे हे कौतुकास्पद आहे. नवनवे प्रयोग कारखाना यशस्वी करून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक संपन्नता आणत आहे. या सर्व घडामोडीमध्ये आपणासह सर्व शास्त्रज्ञ आणि शेतीतज्ज्ञ यांना सामावून घेऊन नव्याने काम करण्याची संधी उपलब्ध झाली असून आमचे सर्वांचे सहकार्य याहीपुढे राहील.

   प्रारंभी कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी एकरी २०० टन ऊस उत्पादनासाठी काय करावे, आहे त्या जमीन क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसे घ्यावे, एकात्मिक खत व्यवस्थापन कसे असावे, सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी व कायम टिकवण्यासाठी काय करावे, नदी बुड क्षेत्रासाठी ऊस जाती व पर्यायी पीक शोधता येतील का, ठिबक सिंचनाचे फायदे, औषधे मारण्याचे नवे तंत्रज्ञान, औषधांचे प्रमाण आदी प्रश्नांचा ऊहापोह केला. शास्त्रज्ञ, शेती तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांच्या चर्चेमधून भागांमधील शेतकऱ्यांना नवी दृष्टी देण्याचे काम श्री दत्त कारखाना करीत असून शेतकऱ्यांना नवी उभारी कशी येईल या दृष्टीने कारखाना नेहमीच सर्वांगाने प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही गणपतराव पाटील यांनी दिली. शास्त्रज्ञ व शेतीतज्ज्ञांनी नवे तंत्रज्ञान, नवे उपाय आणि पर्यायही सुचवावेत असे आवाहन पाटील यांनी केले. शास्त्रज्ञांनी विविध विषयावर चर्चासत्रात भाग घेऊन विविध माहितीच्या आधारे प्रश्नांवर अभ्यासपूर्ण विवेचन केले. प्रोजेक्टरद्वारेही शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. 

    ऍग्रोबोटचे राहुल मगदूम यांनी ड्रोनद्वारे औषध फवारणी बाबत माहिती दिली. डॉ. अरुण मराठे यांनी जमिनीतील सेंद्रिय कर्ब व एकात्मिक खत व्यवस्थापन या विषयी माहिती दिली. जैविक खत व्यवस्थापन याविषयी बी. जी. माळी यांनी मार्गदर्शन केले. पाडेगावचे डॉ. भरत रासकर यांनी ऊस जाती, उत्पादकता व रिकव्हरी याबद्दल विस्तृत माहिती दिली. तसेच डी. एस. टी. ए. चे डॉ. सुरेश पवार यांनी ऊस पिकाचे शरीरशास्त्र व हवामानाचा परिणाम याची माहिती दिली.

  दुपारच्या सत्रात डॉ. एम. एस. पोवार यांचे नॅनो टेक्नॉलॉजीचे महत्व, डॉ. अरुण देशमुख यांचे ठिबक सिंचनाद्वारे खत व पाणी व्यवस्थापन, डॉ. पी. व्ही. घोडके यांचे बीट पिकाचे व्यवस्थापन, डॉ. आर. टी. गुंजाटे व डॉ. बी. पी. पाटील यांचे नदी क्षेत्रात फळ पीक व्यवस्थापन तसेच डॉ. बाळकृष्ण जमदग्नी यांचे ऊस पिकात संजीवकांचे महत्त्व याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन झाले. डॉ. मोहन डोंगरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी स्व. डॉ. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी स्वागत केले. सर्व उपस्थित शास्त्रज्ञ व शेतीतज्ज्ञांचा सत्कार करण्यात आला. व्याख्याते वसंतराव हंकारे यांनी तणावमुक्त आनंदी जीवन याविषयी मार्गदर्शन केले. उपस्थित शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरही उत्तरे देण्यात आली. 

आभार  मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना यांनी मानले. यावेळी कारखान्याचे सेक्रेटरी अशोक शिंदे, संचालक ऍड. प्रमोद पाटील, शेखर पाटील, महेंद्र बागी, श्रीमती विनया घोरपडे, विश्वनाथ माने, सौ. संगीता पाटील कोथळीकर,दरगू गावडे, सौ. यशोदा कोळी, इंद्रजीत पाटील, रघुनाथ पाटील, रमेश पाटील, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, ए. एस. पाटील, शरद पाटील, कृषी विभागातील सर्व खातेप्रमुख व प्रयोगशील शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post