प्रेस मीडिया ऑनलाइन :
सातारा - सातारा-मिरज दुहेरी रेल्वेमार्गाच्या कामाचा खा. उदयनराजे भोसले विभागीय व्यवस्थापकांच्या बैठकीत आढावा घेतला. जिल्ह्यात रेल्वेच्या नवीन कामांचा पाठपुरावा आणि सध्या सुरू असलेल्या कामांमधील काही त्रुटींसंदर्भात त्यांनी पुणे विभागाच्या डीआरएम रेणू शर्मा व इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली.सातारा-मिरज दुहेरी रेल्वेमार्गावर निरा, वाठार, रहिमतपूर, पळशी, ताकारी येथील ओव्हरब्रिजची कामे कधी पूर्ण होणार, या कामांची मुदत किती, साताऱ्यात मालगाड्यांसाठी वेअरहाऊस उभारण्याचे काम, पुणे-सातारा विद्युत इंजिन वाहतुकीची सद्य स्थिती, याबाबत विचारणा करून, पुणे-सातारा-कराड रेल्वेची शटल सेवा सुरू करण्याची आग्रही मागणी उदयनराजेंनी केली. रेल्वे हे सर्वसामान्य प्रवाशांचे आणि मालवाहतुकीचे मुख्य साधन आहे.त्यामुळे सध्या सुरू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत. नवीन प्रकल्पातील सुधारणांचे प्रस्ताव द्यावेत, अशा सूचना त्यांनी केल्या. मी प्रस्तावित केलेले सातारा येथील सुशोभिकरण व वाठार रेल्वेस्टेशनचे पुरातन स्थापत्यकला दर्शवणारे सुशोभिकरण, ही कामे लवकर पूर्ण झाली पाहिजेत. सातारा-मिरज दुहेरी रेल्वेमार्ग आणि कराड-चिपळुण नवीन मार्ग, ही कामे आव्हानात्मक आहेत. रेल्वे क्रॉसिंगसाठी रस्ते वाहतूक थांबवण्याची ब्रिटिशकालीन पद्धत अजूनही सुरू आहे. नागरिकांच्या हितासाठी लोणंद, पळशी, निरा, सातारा, रहिमतपूर, ताकारी येथील रेल्वे क्रॉसिंगच्या ओव्हरब्रिजच्या कामांना गती द्यावी.
सालपे ते वाठार 100 किमी प्रतितास आणि जेजुरी ते वाठार 130 किमी प्रतितास वेगमर्यादा ठेवण्याचे नियोजन अंमलात आणावे. ट्रेन नं. 12630 कर्नाटक संपर्कक्रांती व्हाया पुणे-सातारा या गाडीला साताऱ्यात दोन मिनिटांचा थांबा लष्करी जवानांसाठी आवश्यक आहे. लहान स्थानकांवरही ऑनलाइन तिकिटे मिळण्याची व्यवस्था करावी. सातारा हे जिल्हा मुख्यालय असून, येथून संपूर्ण जिल्ह्यात विविध वस्तूंचा पुरवठा होतो. त्यामुळे सातारा येथे मालधक्का उभारावा. सर्व कामे दर्जेदार आणि मजबूत झाली पाहिजेत, अशा सूचना खा. उदयनराजेंनी दिल्या.