माझी कृष्णामाई स्वच्छता मोहिमे'त सांगलीकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

 चार तासांच्या या मोहिमेत 100 टन कचरा संकलित करण्यात आला.


प्रेस मीडिया लाईव्ह :

सांगली महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'माझी कृष्णामाई स्वच्छता मोहिमे'त सांगलीकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 'माझी वसुंधरा'अंतर्गत आणि कृष्णा नदी जलप्रदूषण मुक्त करण्यासाठीच ही मोहीम घेण्यात आली.या वेळी कृष्णा नदीच्या आणि परिसराच्या स्वच्छतेसाठी हजारो सांगलीकरांनी भाग घेऊन श्रमदान केले. चार तासांच्या या मोहिमेत 100 टन कचरा संकलित करण्यात आला.

सांगलीच्या कृष्णा नदीच्या परिसरात झालेली अस्वच्छता आणि त्यामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी सांगली महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी माझी वसुंधरा अंतर्गत माझी कृष्णामाई स्वच्छता मोहिमेची घोषणा केली होती. या मध्ये महानगरपालिका अधिकारी, पदाधिकारी, कर्मचाऱयांसह जिह्यात विविध सामाजिक संस्था, संघटना तसेच शाळा-महाविद्यालयांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत कृष्णा नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, विद्यार्थी पुढे आले आहेत. या सर्वांनी मिळून वसंतदादा समाधी घाट, स्वामी समर्थ घाट, सरकारी घाट, विष्णू, अमरधाम स्मशानभूमी यासह सांगलीवाडीच्या दोन घाटांची स्वच्छता केली. यामध्ये 100 टन कचरा संकलित झाला असून, 200 टन माती मोहिमेत गोळा झाली आहे. संकलित कचऱयामध्ये प्लॅस्टिक, कागद, झाडी-झुडपे आदींचा समावेश आहे.

या मोहिमेत महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, आयुक्त नितीन कापडणीस, अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे, चंद्रकांत आडके, ब्रॅण्ड अम्बेसिडर डॉ. दिलीप पटवर्धन, अजितकुमार कोष्टी, स्थायी सभापती निरंजन आवटी, समाजकल्याण सभापती सुबाराव मद्रासी, नगरसेवक अभिजित भोसले, जगन्नाथ ठोकळे, तौफिक शिकलगार, नगरसेविका भारती दिगडे, उर्मिला बेलवलकर संघटना याच्यासह सांगलीकर सहभागी झाले होते. मोहिमेचे संयोजन सहायक आयुक्त नितीन शिंदे, सावता खरात, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post