पूर्ववैमनस्य आणि आर्थिक कारणातून ही हत्या झाल्याचा संशय....
प्रेस मीडिया लाईव्ह.कॉम :
सांगली : सांगली शहरातील उत्तर शिवाजीनगर परिसरात शनिवारी रात्री हत्येची एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या ठिकाणी एका सराईत गुन्हेगाराची निर्घृण हत्या केली आहे.संशयित आरोपीनं गुप्ती सारख्या धारदार शस्त्राने पाठीवर, पोटात आणि मांडीवर सपासप वार केले आहेत. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण उपचारा दरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृताच्या एका मित्राला ताब्यात घेतलं आहे.त्याची कसून चौकशी केली जात आहे. नवनाथ दिलीप लवटे असं हत्या झालेल्या 26 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो सांगली शहरातील शिवशंभो चौक परिसरातील रहिवासी आहे. मृत लवटे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत नवनाथ आणि आरोपी योगेश दोघंही एकमेकांचे मित्र होते. घटनेच्या दिवशी शनिवारी रात्री साडे सातच्या सुमारास दोघंही उत्तर शिवाजीनगर परिसरातील एका कॉफी हाऊससमोर भेटले होते. दरम्यान अचानक बाहेरील कट्ट्याजवळ दोघांमध्ये वादावादी झाली. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी योगेश यानं गुप्ती सारख्या तीक्ष्ण हत्याराने नवनाथवर सपासप वार केले आहेत.
नवनाथच्या पाठीवर, पोटात आणि मांडीवर तब्बल आठ वार आढळले आहेत. हा थरारक घटनेनंतर आसपासच्या लोकांनी जखमी अवस्थेतील नवनाथला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं. पण याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. मृत लवटे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून दोन महिन्यांपूर्वी बाजार समितीच्या संचालकाकडे खंडणी मागण्याच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी योगेश याला रात्री उशिरा ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.