उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
पोलीस उपनिरीक्षकाचे तडकाफडी निलंबन करण्यात आले
प्रेस मीडिया ऑनलाइन :
जिलानी (मुन्ना ) शेख :
पुणे : पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे असे निलंबीत करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. तर, या घटनेत कश्मिरा प्रशांत भंडारी (वय २०) हिचा मृत्यू झाला आहे.
पुण्यासारख्या शहरात दिवसाला एकतरी भीषण अपघात होत असताना 'पुणे पोलीस' त्याबाबत किती गांर्भिय बाळगतात हे एका अपघाताच्या घटनेवरून स्पष्ट होत आहे. कचरा गोळा करणाऱ्या कंटेनरच्या धडकेत २० वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर पोलीसांकडून या घटनेचा तपासच करण्यात आला नाही. तर, त्या चालकाला देखील अटक केली गेली नाही. तरूणीच्या वडिलांनी न्यायासाठी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांना याची माहिती दिली अन अजित पवारांनी त्यांच्या 'स्टाईल'ने वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर पुणे पोलीस जागे झाले. त्या चालकाला अटक करत संबंधित पोलीस उपनिरीक्षकाचे तडकाफडी निलंबन करण्यात आले आहे. परंतु, पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांना साधी तंबी देखील दिली गेली नाही.
पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे असे निलंबीत करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. तर, या घटनेत कश्मिरा प्रशांत भंडारी (वय २०) हिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कंटेनर चालक शरद मानसिंग लोखंडे (वय ३६) याला अटक केली आहे. याबाबत कश्मिरा हीच्या आत्या शिल्पा भोसले (वय ५०) यांनी तक्रार दिली होती.गेल्या महिन्यात (दि. ५ जानेवारी) स्वारगेट परिसरातील मुकूंदनगर येथील सुजय गार्डनसमोर कश्मिरा प्रशांत भंडारी या तरूणीला मनपाच्या कचरा गोळा करणाऱ्या कंटेनरने तिच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत कश्मिरा भंडारी हिचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे यांच्याकडे सोपविला गेला होता. परंतु, त्यांनी गुन्ह्याचा तपास केला नाही. दरम्यान, शिल्पा भोसले यांनी २५ जानेवारी रोजी स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेतली व त्यांना विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी तपासच केला गेला नाही, असे समजले. त्यामुळे भंडारी कुटूंबिय निराश झाले.
पालकमंत्री अजित पवार यांचे मानले आभार
कश्मिरा भंडारी यांचे वडिल प्रशांत आणि त्यांच्या कुटूंबियांनी पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात आल्यानंतर भेट घेतली. पालकमंत्री अजित पवारांनी त्यांच्याच स्टाईलने वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनकरून धारेवर धरले आणि तपासाला वेग आला. त्यात पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे यांनी तपासात हयगय करून टाळाटाळ केली. त्यामुळे त्यांचे निलंबन केले आहे. यानंतर प्रशांत भंडारी कुटूंबियांनी पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री अजित पवार यांचे धन्यवाद मानले आहेत. दरम्यान, शहरात या घटनेची पुणेकरांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.