भाजप मधील तब्बल १५ नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश करणार
प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी ( मुन्ना ) शेख :
पुणे : महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर येत्या १५ मार्च रोजी भारतीय जनता पार्टीतील तब्बल १५ नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला.दरम्यान, माजी नगरसेविका व गुंड गजा मारणे याच्या पत्नी जयश्री मारणे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला.
कोणत्याही परिस्थितीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता ताब्यात घ्यायचीच असा चंग राष्ट्रवादी कॉंग्रेसने बांधला आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या कडून त्यासाठी दोन्ही शहराध्यक्षांना ताकद देण्यात येत आहे. भाजपाकडे सध्या असलेल्या नगरसेवकांमध्ये बहुसंख्यजण गेल्यावेळी राष्ट्रवादीतून भाजपात आलेले आहेत.
पाच वर्षानंतर या साऱ्यांची घरवापसी करण्यात येणार आहे. या माध्यमातून भाजपाला कमकुवत करून दोन्ही शहरातील सत्ता ताब्यात घेण्याची राष्ट्रवादीची योजना आहे.मारणे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून २०१२ च्या महापालिका निवडणुकीत निवडून आल्या होत्या.मारणे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीत 'इनकमिंग' सुरू झाले असून येत्या काळात यात आणखी वाढ होणार असल्याचे शहराध्यक्ष जगताप यांनी सांगितले.महापालिकेची पाच वर्षांची मुदत येत्या १४ मार्चला संपत आहे. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ मार्चला भाजपाचे विद्यमान १६ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे शहराध्यक्ष जगताप यांनी सांगितले.जसजशी निवडणूक जवळ येईल, तशी ही संख्या वाढत जाईल, असा दावा जगताप यांनी केला.पुण्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत.
यापैकी सहा मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत.दोन मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आहेत.आठपैकी जवळपास सर्वच मतदारसंघात भाजपाची पडझड होण्याची शक्यता आहे. या सर्वच मतदारसंघातील अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यातही भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. शहराध्यक्ष जगताप यांनी आज सांगितलेल्या १६ जणांमध्ये देखील वडगाव शेरीतील अधिक नगरसेवक आहेत