गोंधळातच बैठक तहकूब करण्यात आली.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : जिलानी ( मुन्ना ) शेख :
पुणे - प्रभागांतील रस्ते, चौक, महानगरपालिकेच्या निधीतून उभारलेल्या मिळकतींना नावे देण्यासाठी कुरघोड्यांचे राजकारण सुरू आहे. यातूनच नाव समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत भाजप आणि विरोधी पक्ष सदस्यांत गोंधळ झाला.भाजप सदस्यांनी आणलेले प्रस्ताव नियमबाह्य असल्याचे सांगत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच शिवसेना सदस्यांनी गोंधळ घालत फाइल, तसेच टेबल वरील साहित्यांची फेकाफेक केली. त्यामुळे या बैठकीत गोंधळ उडाला. या गोंधळातच बैठक तहकूब करण्यात आली.
महापालिकेची मुदत संपण्यास अवघ्या महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे प्रभागांतील विकासकामांचे उद्घाटन करण्याची नगरसेवकांची लगबग सुरू आहे. प्रामुख्याने विकासकामाला आपली 'संकल्पना' असावी, यासाठी नगरसेवकांकडून रस्ते, चौक, सुशोभीकरणाची कामे यांना नावे देण्यासाठी प्रस्ताव देण्यात आले आहेत. असे बहुतांश प्रस्ताव शुक्रवारी होते.
सभा सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांनी आपले प्रस्ताव मान्य करण्याची मागणी केली. मात्र, काही प्रस्ताव भाजपचे नगरसेवक तसेच विरोधी नगरसेवकांनी एकमेकांविरोधात दिले होते. ते मंजूर करण्यास नाव समिती अध्यक्षांनी नकार दिला. विधी विभागाने स्पष्ट अभिप्राय द्यावा, अशी भूमिका घेतली. त्यावरून गोंधळ सुरू असतानाच भाजप सदस्यांचे प्रस्ताव आले.
नियमानुसार 'प्रभागात एखाद्या घटकास नाव द्यायचे असल्याचे चार मधील तीन सदस्यांच्या स्वाक्षरी' असणे बंधनकारक आहे. मात्र, भाजपने दिलेल्या अनेक प्रस्तावांमध्ये दोन सदस्यांच्या आणि तिसरी सही सभागृह नेत्यांची होती. त्यामुळे विरोधी नगरसेवकांनी त्याला आक्षेप घेतला. त्यावर विधी विभागाचा सल्ला घेण्यावरून दोन्ही नगरसेवकांत खडाजंगी झाली.
कॉंग्रेसचे अविनाश बागवे, शिवसेनेचे विशाल धनवडे, राष्ट्रवादीचे गणेश ढोरे, महेंद्र पठारे यांनी यांनी फाइल, टेबलवरील साहित्यच उधळले. त्यामुळे बैठकीत गोंधळ उडाला. त्यानंतर मुख्यसभा सुरू झाल्याचे कारण देत सभा तहकूब करण्यात आली. तर, हा गोंधळ भाजपच्या आडमुठेपणामुळे झाल्याचा दावा विरोधी सभासदांनी केला आहे.
नाव समितीमध्ये यापूर्वीही अनेक प्रस्तावांना स्वीकृत सदस्यांची स्वाक्षरी आहे. हे प्रस्ताव मुख्यसभेनेही मान्य केलेले आहेत. मात्र, विरोधक केवळ राजकारण करत असून त्यांच्यांकडून गोंधळ घालत कामकाजात अडथळा आणला जात आहे. त्यामुळे असे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत.
- धनराज घोगरे, अध्यक्ष, नाव समिती, मनपा