प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी ( मुन्ना ) शेख :
पुणे- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत जगताप यांच्या प्रभाग 25 ड-संविधान चौकात तब्बल 1 कोटी रुपये खर्चून राष्ट्रध्वज उभारला जाणार आहे. या प्रस्तावास अद्याप पालिकेच्या वित्तीय समितीची मान्यता नसली, तरी या कामासाठी निविदा काढण्याचे आदेश एका अतिरिक्त आयुक्तांनी दिल्याची चर्चा आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पातून शहरात स्मार्ट सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. त्याच्या देखभाल-दुरुस्तीसाठी 58 कोटींची निविदा मंजूर करण्यास भाजपसह राष्ट्रवादीनेही एकमुखी मान्यता दिली. त्यानंतर लगेचच स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी नगरसेवकांसाठी 64 कोटी रुपयांचे वर्गीकरण मान्य करण्यात आले होते. यात जगताप यांच्या प्रभागातील संविधान चौकात हा राष्ट्रध्वज उभारण्यासाठी 1 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, ध्वजासाठी 75 लाखांचा खर्च येणार आहे.
महापालिका सभागृहाची मुदत संपत आहे. तसेच आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी करावयवची अत्यावश्यक कामे, सोयी-सुविधांसाठी आयुक्तांनी सर्व विभाग प्रमुखांना पत्र पाठवले आहे. वित्तीय समितीसमोर अशी कामे सादर करण्याच्या सूचना त्यात दिल्या आहेत. तर, विद्युत विभागाने हा झेंडा उभारण्याचा प्रस्ताव 'अत्यावश्यक काम' म्हणून नमूद केला आहे. या कामासाठी वर्गीकरणाचा ठरावही जोडला आहे. हा प्रस्ताव पुढील काही दिवसांत वित्तीय समिती समोर सादर केला जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच अतिरिक्त आयुक्तांनी प्रस्तावाच्या निविदा तातडीने काढण्याचे आदेश दिल्याची चर्चा आहे.
निवडणुकांच्या तोंडावर भाजपने उधळपट्टीचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्याला अर्थातच राष्ट्रवादी कॉंग्रेसने विरोध केला आहे. विशेष म्हणजे, पक्षाचे शहराध्यक्षच निर्णयांना विरोध करतात. पण, स्थायी समिती सदस्यांनी हे प्रस्ताव मंजूर केले आहेत. त्याचवेळी मुख्यसभेत हे प्रस्ताव आल्यानंतर राष्ट्रवादीने प्रत्येक वेळी भाजपला साथ देत हे प्रस्ताव गुपचूप मान्य केले आहेत. अशा निर्णयांवेळी राष्ट्रवादीचे सदस्य गायब झाल्याचे वारंवार आढळले. त्यामुळे उधळपट्टीला राष्ट्रवादीचा विरोध नावालाच असल्याचे दिसून येते. आता या 64 कोटींच्या वर्गीकरणात केवळ जगताप यांच्या प्रस्तावासाठी प्रशासन तसेच भाजपचे पदाधिकारी पुढाकार घेत असल्याने महापालिकेत उलट-सुलट चर्चा आहेत.
उधळपट्टीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोधच आहे. मात्र, पक्ष म्हणून आम्ही कधीही राष्ट्रध्वज बसविण्यास विरोध केला नाही. माझ्या प्रभागात लष्कर, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या, तसेच लष्कराचे अनेक सेवानिवृत्त अधिकारी वास्तव्यास आहेत. त्यामुळे हा राष्ट्रध्वज उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यात काहीच गैर नाही.
- प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, तथा नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेस