पुणे ते महू दरम्यान १५ फेब्रुवारी पासून आयोजन
प्रेस मीडिया लाईव्ह :
अनवर अली शेख :
पुणे : फेब्रुवारी महू (मध्य प्रदेश ) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी स्मारकाचे व्यवस्थापन करणाऱ्या डॉ.आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या ठिकाणी मध्य प्रदेश सरकारने नवी स्मारक समिती स्थापन करुन स्मारकाचे व्यवस्थापन सोपवल्याने ,संघ परिवाराचा कब्जा केला जात असल्याचे स्पष्ट झाल्याने स्मारक वाचविण्यासाठी पुणे ते महू भीमज्योत मशाल यात्रेला मंगळवारी सकाळी डॉ.आंबेडकरांच्या जयघोषात प्रारंभ झाला.संयुक्त संविधान बचावो कृती समिती,भीम जन्मभुमी बचावो कृती समिती,इनक्रेडिबल समाजसेवक गृप च्या वतीने या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे .
असलम इसाक बागवान हे या यात्रेचे नेतृत्व करीत असून १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता डॉ आंबेडकर पुतळा (रेल्वे स्टेशन ) येथून यात्रेला प्रारंभ करण्यात आला. औरंगाबाद,जळगाव,भुसावळ मार्गे महूला ही यात्रा १९ फेब्रुवारी रोजी पोहचेल. 20 फेब्रुवारी पासून अहिंसक मार्गाने बेमुदत सत्याग्रहास सुरूवात होईल, मागणी मान्य होई पर्यन्त सुरु राहिल.
यावेळी असलम इसाक बागवान,विलास किरोते, राजू पंजाबी, संदेश दिवेकर , सचिन आल्हाट, राजू सय्यद, निखिल जाधव उपस्थित होते. मध्य प्रदेश सरकारने महू येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे व्यवस्थापन करणारी डॉ.आंबेडकर मेमोरियल सोसायटी ही १९७२ साली स्थापित मूळ संस्था बाजुला करुन नवी स्मारक समिती स्थापन करून त्यात संघ विचाराचे सदस्य घुसविण्यात आले आहेत.असंवैधानिक पद्धतीने ही समिती तयार केली असून डॉ आंबेडकर जन्मभूमीवर कब्जा मिळविणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.याविरोधात भारतभर आंदोलन करण्यात येणार असून ही यात्रा त्याचाच एक भाग आहे.नव्याने स्थापन केलेली समिती रद्द करावी ,अशीही मागणी करण्यात आली .
ज्या बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तयार करून कायद्याची परिभाषा तयार केली त्यांच्याच स्मारकाचे संचालन करणारी समिती असंवैधानिक पद्धतीने ताब्यात घेतली जात आहे , भ्रष्टाचार केला जात आहे,हे संतापजनक आहे .विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांना याबाबत कल्पना देऊन स्मारक समिती वाचविण्याचे आंदोलन मोठे करण्यात येणार आहे,डॉ.आंबेडकर यांचा विचार दाबण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप या वेळी करण्यात आला.
डॉ.आंबेडकर मेमोरियल सोसायटी या मूळ संस्थेच्या अध्यक्षांचे निधन झाल्यावर काही सदस्यांनी नवे सदस्य बनवून निवडणूक घेतली गेली . त्याविरोधात निबंधकाकडे तक्रार करण्यात आली आहे . या बाबतीत न्यायालयात देखील धाव घेण्यात आली आहे,अशी माहिती यावेळी देण्यात आली . त्या जागी डॉ.आंबेडकर स्मारक समिती ही नवी संस्था स्थापन करून स्मारकाचे संचालन या नव्या संस्थेला देण्यात आले आहे, जे बेकायदेशीर, असंवैधानिक आहे.
शाहीन बाग, शेतकरी आंदोलनांची ठिकाणे, जयपूर उच्च न्यायालयातील मनूचा पुतळा येथेही ही यात्रा भेट देणार आहे. देशातील धर्मनिरपेक्षता, लोकशाही समाजवाद , संविधान जपण्यासाठी यात्रा कार्यरत राहणार आहे.