प्रेस मीडिया :
अनवरअली शेख :
पुणे : महाराष्ट्रात बंदी असणाऱ्या गुटख्याचे भाव गगनाला भिडले असून, टपऱ्याटपऱ्यांवर मिळणारा गुटखा मिळण्यास देखील अडचणी येऊ लागल्या आहेत. अचानक झालेल्या भाव वाढीने तर्कविर्तक काढले जात आहेत. तत्पुर्वी किरकोळ विक्रेते हैराण झाले आहेत. एक पुडा साडे अकराशे रुपयांना ठोक विक्रेत्यांकडून मिळत आहे. त्यामुळे गल्लीत विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांनी विक्री बंद ठेवली आहे. दरम्यान, पुणे पोलीसांनी नुकताच कोट्यावधी रुपयांचा गुटखा पकडला होता. त्याचा परिणाम असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. पण, गुटखा किंग एकत्रित आले असून, झालेले नुकसान भरून काढण्यासाठी भाव वाढ झाल्याची माहिती आहे. आठवडाभर हीच परिस्थिती असणार असून, त्यानंतर पुढच्या आठवड्यात पुन्हा तो पुर्वीप्रमाणे मिळेल, अशीही माहिती आहे.
राज्यात असणारी गुटखा बंदी नावालच असल्याचे सर्वश्रुत आहे. पुण्यात देखील गुटख्याची आवक अन विक्री मोठी आहे. शहरा-शहरात गुटखाकिंग आहेत. त्याप्रमाणे पुण्यात देखील आहेत. पुण्यातील ठरावीक भागातही गुटखाकिंग आहेत. तर, गुटखा ठेवण्यासाठी त्यांनी गोडाऊन भाडे तत्त्वावर घेतले आहेत. उपनगरांत हे गोडाऊन आहेत. छुप्या पद्धतीने परराज्यातून गुटखा पुण्यात आणून त्याची किरकोळ व्यावसायिकांना विक्री होत आहे. ट्रकभरून गुटखा मागविला जात असतो. ट्रकमधून रात्रीअपरात्री तो योग्यठिकाणी नेला जातो. त्यानंतर तेथून ठोकस्वरूपात आणि किरकोळ स्वरूपात विक्री होते. त्यासाठी स्थानिक पोलीस अन गुन्हे शाखेचे हात ओले केले जातात. त्यासोबतच या छुप्या पद्धतीने एफडीए देखील त्यात सामिल असते.
मध्यंतरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुटखा कारवाई तीव्र करत परराज्यात देखील कारवाया केल्या होत्या. त्यानंतर या गुटखा माफियांचे धाबे दणाणले होते. देशात खळबळ उडाली होती. त्यानंतर हे गोडाऊन शहराच्या हद्दीतून ग्रामीणच्या हद्दीत नेले होते. त्यातही या गुटखा माफियांनी हुशारी केली. शहर पोलीसांच्या हद्दीला लागूनच ग्रामीणच्या हद्दीत गोडाऊन उभारले होते. त्यामुळे वसूली वाल्यांना गोडाऊन तर दिसायचे पण, कारवाईला अडचणी येत असत. या सर्वप्रकारामुळे चांगलीच चिडचिड झाली होती.
शहरातच ठरावीक गुटखा किंग आहेत. मध्यवस्थीमधून हे रॅकेट पुर्वी चालत होते. आता ते बदलले असल्याचे सांगितले जाते. दरम्यान त्या कारवाया झाल्यानंतर देखील इतका तुटवडा गुटख्यात झाला नव्हता. परंतु, सध्या मोठा तुटवडा झाला असल्याची माहिती आहे. गेल्या आठवड्यात गुन्हे शाखेच्या पोलीसांनी मोठ्या प्रमाणात गुटखा साठा पकडला. त्यापुर्वी हडपसर पोलीसांनी देखील तीन ट्रक गुटखा पकडला. त्याचा परिणाम आता झाल्याचे सांगितले जाते. शहरात गुटख्याचा तुटवडा तीव्र असून, यापुर्वी आरएमडीची २० रुपयांना मिळणारी पुडी आता थेट ३० रुपयांना मिळत आहे. त्यातही ठरावीकच ठिकाणी तो भेटत आहे. तर, विमलमध्येही वाढ झाली असून, १० रुपयांची पुडी आता १५ रुपयांना अन १५ रुपयांची पुडी २० रुपयांना मिळत आहे. ही गुटखा वाढ अचानक झाल्याने खाणाऱ्यांची पंचायित झाली आहे. तर, विक्रेते हैराण झाले असून, त्यांनी विक्रीच बंद केली आहे. दरम्यान, आठवड्या भर अशीच टंचाई असणार असून, त्यानंतर ती कमी होईल, असे सांगितले जाते. परंतु, अचानक झालेल्या गुटखा तुटवड्याने भलत्याच चर्चा रंगल्या आहेत.
गुन्हे शाखेचे दोन विभाग चैतन्यात.
पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेतील दोन विभागात गुटखा चैतन्यमय आहे. अमली पदार्थांची तस्करी मोहिम राबवत ते या गुटख्यावर देखील नजर ठेवून आहेत. या दोन विभागाची शहरभर मदार असून, सर्वठिकाणी त्यांची ये-जा असते. ही चर्चा देखील पोलीस दलात चांगलीच असून, आयुक्तांना नको असणाऱ्या गुटख्यावर त्यांचे चैतन्य असल्याने मोठा गोंधळ आहे.