प्रेस मीडिया ऑनलाइन :
पुणे : जीलानी ( मुन्ना )शेख :
पुणे : भाजपचे नेते किरीट सोमय्या हे जम्बो कोविड सेंटरबाबत तक्रार करण्यासाठी पुणे महापालिकेत गेले असताना काल (ता.५) राडा झाला होता. शिवसैनिकांशी झालेल्या झटापटीत सोमय्या जखमी झाले होते. यानंतर सोमय्यांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच सोमय्यांनी पुन्हा शिवसेनेला अंगावर घेतले आहे.
रुग्णालयातून सुटताच सोमय्यांनी शिवसेनेला पुन्हा अंगावर घेतले आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, पुण्यातील संचेती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. पुणे महापालिकेत जाऊन संजय राऊत यांचे कौटुंबिक भागीदार सुजीत पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध कोविड सेंटर्स घोटाळ्यांबाबत तक्रार दाखल केली. माफिया सेना मला ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यापासून रोखू शकत नाही.
सोमय्यांना काल झालेल्या प्रकारानंतर संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. हाताला बँडेज लावलेल्या अवस्थेत व्हीलचेअरवरून सोमय्या आज सकाळीच रुग्णालयातून थेट पुणे महापालिकेत पोचले. कालचा प्रकार लक्षात घेता सोमय्यांच्या झेड सुरक्षेसोबत आज मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली होती. सोमय्यांनी जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहाराची तक्रार केली आणि लगेच ते तिथून निघून गेले.
सोमय्या हे काल महापालिकेत आले असतानाता शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांसोबत त्यांची बाचाबाची झाली. संतापलेल्या शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या कारच्या काचांवर हाताने ठोसे मारत त्यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. मात्र आक्रमक शिवसैनिकांशी झालेल्या झटापटीत किरीट सोमय्या अक्षरश: महापालिकेच्या पायऱ्यांवर पडले. किरीट सोमय्याच्या सुरक्षारक्षकांनी शिवसैनिकांना बाजूला करत त्यांना बाहेर काढले. दरम्यान, यावेळी झालेल्या झटापटीमुळे महापालिकेच्या आवारात चांगलाच गोंधळ उडाला होता.
या झटापटीत जखमी झाल्याने किरीट सोमय्या यांना संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संचेतीमध्ये जाऊन सोमय्यांची विचारपूस केली होती. यानंतर सोमय्यांनी ट्विट करत शिवसैनिकांवर निशाणा साधला होता. पुणे महापालिकेच्या आवारात शिवसेनेच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला, असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर आरोप केला आहे. पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. या भ्रष्टाचाराची तक्रार देण्यासाठी सोमय्या हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले होते. त्यानंतर ते पुणे महानगरपालिकेत पत्रकार परिषदही घेणार होते. मात्र, महापालिकेत गोंधळ झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते.