कर्मचाऱ्यांसह सभागृह नेते आणि नगरसेवकांनाही अडकून पडावे लागले
प्रेस मीडिया ऑनलाइन :
जीलानी (मुन्ना) शेख :
पुणे- चहा पिण्याचे कारण सांगून कामकाजाच्या वेळेत बाहेर गेलेल्या कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेत गुरुवारी 'नो एन्ट्री' करण्यात आली. या मध्ये कर्मचाऱ्यांसह सभागृह नेते आणि नगरसेवकांनाही अडकून पडावे लागले.येथून पुढे महापालिका भवनात प्रवेशाबाबत कडक नियम अमलात आणले जाणार आहेत.
उगाच टंगळमंगळ करीत पालिका भवनाबाहेर फिरणाऱ्या नगरसेवकांना चाप बसण्यासाठी हा उपाय केला जात असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्यावरील धक्काबुक्कीच्या निषेधार्थ शुक्रवारी जे शक्तीप्रदर्शन महापालिकेत होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर पोलिसांची छावणीच उभारण्यात येणार असून, विना काम आलेल्यांना महापालिकेत एन्ट्रीच दिली जाणार नाही.
महापालिकेमध्ये गुरुवारी दुपारी अचानक सुरक्षारक्षकांनी महापालिका भवनाचे सर्व प्रवेशद्वार बंद करून बाहेर 'चहा'साठी गेलेल्यांना 'नो एन्ट्री' करून टाकली. आम्ही पालिकेचे कर्मचारी आहोत, असे सांगूनही त्यांना आत सोडले नाही. या आदेशानुसारच ही कार्यवाही सुरू असल्याचे सुरक्षारक्षकांनी सांगितले. सुमारे अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ बाहेर हुज्जत घालत उभे राहिल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. येथून पुढे अशी कारवाई दररोज केली जाणार आहे.