प्रेस मीडिया ऑनलाइन :
जीलानी ( मुन्ना ) शेख :
पुणे - महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. दुसऱ्या बाजूला या रचनेत सुमारे 12 ते 13 प्रभागांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आजी-माजी पदाधिकारीच अडचणीत आल्याचे समोर येत आहे.या पदाधिकाऱ्यांनी थेट आक्षेप उपस्थित केल्याने तसेच नाराजी व्यक्त केल्याने आता राष्ट्रवादीकडूनही प्रभाग रचनेवर हरकती घेतल्या जाणार आहेत.
वाचा...https://www.pressmedialive.com/2022/02/Pimpri-chinchwad-news-_01289727869.html
माजी उपमहापौर, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती अध्यक्ष राहिलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनाच प्रभाग अडचणीचे झाल्याने पक्षाकडून हरकती नोंदविण्यात येणार आहेत. प्रभाग रचनेनंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी 'ही प्रभाग रचना पक्षाला अनुकूल असून पक्षाचे सुमारे 122 नगरसेवक निवडून येतील,' असा दावा केला होता. मात्र, प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर नगरसेवकांची बैठक घेण्यात आलेली नव्हती. यावर दोन दिवसांपूर्वी निवडणूक प्रभाग रचना, आघाडी करण्याबाबत बैठक झाली. या बैठकीत या पदाधिकाऱ्यांनी प्रभाग रचनेबाबत थेट नाराजी व्यक्त केली. काही जणांचे प्रभागच कसे चांगले झाले? असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर पक्षाकडून या पदाधिकाऱ्यांच्या प्रभागाबाबत चर्चा 14 फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदविण्याची तयारी केली आहे.
प्रभाग रचनेवरून नाराज असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही पदाधिकारी भाजपच्या संपर्कात असल्याचेदेखील समोर आले आहे. त्यात शहराच्या पूर्व भागातील एका पदाधिकाऱ्याने नुकतीच भाजपच्या एका पदाधिकाऱ्याची भेट घेतली आहे. यात त्यांनी प्रभाग रचनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, ही भेट प्रभागातील कामांसाठी असल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात हा पदाधिकारी प्रभाग रचनेमुळेच भेटायला आल्याचे भाजपचे पदाधिकारी खासगीत सांगत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात चलबिचल वाढली आहे.