बॅनरबाजीमुळे नागरिकांकडून मात्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी (मुन्ना) शेख :
पुणे : महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्याने गल्लीबोळात बॅनरबाजीला उधान आले आहे. आजी-माजी राजकीय दावेदार उमेदवारांसह गेल्या पंचवार्षिक मध्ये कधीही न पाहिलेले 'इच्छुकां'चे चेहरेही 'भावी नगरसेवक' म्हणून बॅनरवर चौकाचौकात झळकू लागले आहेत, अशा बॅनरबाजीमुळे नागरिकांकडून मात्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शहरालगतच्या गावांचा समावेश करण्यात आल्यानंतर महापालिकेची ही पहिलीच निवडणूक होत आहे. त्यामुळे 'प्रथम नगरसेवक'चा मान मिळवण्यासाठी अशा गावांत इच्छुकांची यादी प्रभाग रचनेनंतर वाढतच चालली आहे. गल्लोगल्ली भावी नगरसेवक उदयास आले आहेत. यातून बॅनरबाजीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू होताच आजी-माजी राजकीय लोकप्रतिनिधींसह इच्छुक उमेदवारांकडून चौकाचौकात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुरू झाली आहे. गल्लीबोळातून व चौकाचौकात राजकीय तसेच वैयक्तिक बॅनर झळकत आहेत. दिशादर्शक फलक व बसथांबे, रस्त्यावरील पथदिव्यांच्या खांबांवरही बॅनर लावले जात आहेत.अनेक चौक वाहतूक कोंडीसह आता बॅनरबाजीनेही जॅम झाले आहेत. यातून परिसराचे विद्रूपीकरण वाढत असून उपनगरांतील जुन्या खानाखुणा झाकोळत आहेत. महापालिका प्रशासनाकडून मात्र अशा बॅनरबाजीवर कोणतीही कारवाई होत नाही, मुख्य चौक बॅनरजीतून मोकळे करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.